सोशल मीडिया आणि इंटरनेटवरही आदर्श आचारसंहिता लागू
एआय व्हिडिओंवर कडक नजर : उल्लंघन केल्यास राजकीय पक्षांवर कारवाई
नवी दिल्ली : खरा पंचनामा
बिहार निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. आदर्श आचारसंहितेअंतर्गत यावेळी इंटरनेट आणि सोशल मीडियाचाही समावेश करण्यात आला असून राजकीय पक्षांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
बिहार निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी प्रचाराला वेग दिला आहे. एकमेकांवर टीका करताना अनेक पक्ष सोशल मीडिया आणि एआयचा वापर करत आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर रोजी सात कलमी पत्र जारी करून प्रचाराची पारदर्शकता राखण्याचे निर्देश दिले. आयोगाने सांगितले, की यावेळी आदर्श आचारसंहितेत सोशल मीडियासह इंटरनेटचा समावेश असेल आणि कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनावर कठोर कारवाई केली जाईल.
आयोगाने स्पष्ट केले, की बिहार विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच आठ विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांच्या घोषणेसह आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सोशल मीडियासह इंटरनेटवर उमेदवार आणि पक्षांनी पोस्ट केलेल्या सर्व कंटेंटवरही या नियमांचा अंमल राहणार आहे. हा नियम फक्त बिहारच नव्हे, तर इतर राज्यांतील पोटनिवडणुकांनाही लागू होईल.
आयोगाने पक्षांना इशारा दिला आहे, की प्रचारादरम्यान इतर पक्षांवर टीका करताना ती फक्त धोरणे, कार्यक्रम, भूतकाळातील कामगिरी आणि नोंदींपुरती मर्यादित असावी. कोणत्याही पक्षाच्या नेत्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका केल्यास ते आचारसंहितेचे उल्लंघन मानले जाईल. निराधार आरोप किंवा विकृतीकरण टाळण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
अलीकडेच, काही पक्षांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षविरुद्ध एआयच्या माध्यमातून बनवलेले व्हिडिओ प्रसारित केले होते. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले. यानंतर आयोगाने स्पष्ट केले की, एआय व्हिडिओंचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही. सर्व राजकीय पक्ष, त्यांचे नेते, उमेदवार आणि स्टार प्रचारक यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास त्या व्हिडिओंवर 'AI-generated' असे लेबल स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक असेल.
आयोगाने सर्व पक्षांना पारदर्शक, स्वच्छ आणि नियमबद्ध प्रचार करण्याचे आवाहन केले आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियावर देखील कठोर देखरेख ठेवण्यात येणार आहे. आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास तातडीने कारवाई होणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.