Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इचलकरंजीतील कुख्यात 'एसएन' गॅंगवर मोका!विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा दणकाटोळीप्रमुख सलमान नदाफसह सहाजणांचा समावेश

इचलकरंजीतील कुख्यात 'एसएन' गॅंगवर मोका!
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा दणका
टोळीप्रमुख सलमान नदाफसह सहाजणांचा समावेश

कोल्हापूर : खरा पंचनामा

खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, प्राणघातक शस्त्रांसह गर्दी मारामारी, आदेशाचा भंग असे १८ गंभीर गुन्हे दाखल असलेली इचलकरंजीतील 'एसएन' गॅंगवर (सलमान नदाफ टोळी) मोकाअंतर्गत कारवाई करण्यास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मंजुरी दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कारवाईने इचलकरंजीतील गुन्हेगारीला महानिरीक्षक फुलारी यांनी जोरदार दणका दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महानिरीक्षक फुलारी यांनी या कारवाईतून दिला आहे. कारवाई झालेल्यांमध्ये टोळीप्रमुख सलमान नदाफसह सहाजणांचा समावेश आहे.
सलमान राजू नदाफ (वय २५, रा. गावभाग, इचलकरंजी), अविनाश विजय पडियार (वय १९, मूळ रा. गोसावी गल्ली, इचलकरंजी, सध्या रा. यड्राव), अरसलान यासीन सय्यद (वय १९, रा. सुतारमळा इचलकरंजी, मूळ रा. जवाहरनगर, इचलकरंजी), यश संदीप भिसे (वय १९, रा. रामनगर, शहापूर), रोहित शंकर आसाल (वय १९, रा. शिंदे मळा, खोतवाडी), अनिकेत विजय पोवार (वय २२, रा. दत्तवाड, ता. शिरोळ) अशी मोकाअंतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत. दि. १५ जुलै रोजी पूनम कुलकर्णी यांच्या दुकानाजवळ सहाजण फटाके उडवत होते. त्यावेळी फटाके अंगावर येत असल्याने दूर जाऊन उडवा असे कुलकर्णी यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर या टोळीने चिडून त्यांना दगड फेकून मारले. तसेच त्यांच्या दुकानाचे दरवाजे, खिडकी, फलक तोडले तसेच शेजारील दुकानाच्या शटरचे तसेच एका शौचालयाचे नुकसान केले. याबाबत इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या गुन्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर इचलकरंजीचे अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना तातडीने या 'एसएन' गॅंगवर मोकाअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी पोलीस ठाण्याचे प्रभारी महेश चव्हाण या टोळीविरूद्ध मोकाअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठवला. या टोळीविरूद्ध १८ गंभीर गुन्हे दाखल असल्याने प्रस्तावाच्या कायदेशीर बाजू तपासून तो प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. महानिरीक्षक फुलारी यांनी या टोळीविरूद्ध मोका अधिनियमाचे कलम वाढवून या टोळीविरूद्धचा मोकाच्या प्रस्तावास मंजुरी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.