काळ्या बाजारासाठी रेशनिंगच्या तांदळाची अवैध वाहतूक करणाऱ्या एकाला अटक
ट्रकसह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त : उमदी पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
काळ्या बाजारासाठी रेशनिंगच्या तांदळाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. त्यांच्याकडुन 10.3 लाखांचा तांदूळ, 25 लाखांचा ट्रक असा 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मिरज-पंढरपूर रस्त्यावरील लवंगा गावाजवळ उमदी पोलिसांनी ही कारवाई केली.
तिपन्ना हेबालेवा मदार (वय ३९, व्यवसाय ड्रायव्हर रा. चन्नापूर ता. रामदुर्ग जि. बेळगाव) असे अटक केलेल्याचे नाव असून यलाप्पा बालाप्पा देसाई (रा. चन्नापूर ता. रामदुर्ग जि. बेळगाव) हा पसार झाला आहे. रेशनिंगच्या तांदळाची काळ्या बाजारासाठी अवैधरित्या मिरज पंढरपूर रस्त्यावर वाहतूक होत असल्याची माहिती उमदी पोलिसांना खबऱ्याद्वारे मिळाली. पोलिसांनी या रस्त्यावर लवंगा येथे सापळा रचला.
माहितीप्रमाणे ट्रक (केए 36 सी 5852) तेथे आल्यावर पोलिसांनी तो अडवला. त्याची तपासणी केल्यावर त्यामध्ये रेशनिंगच्या तांदळाची पोती सापडली. याची माहिती जतच्या पुरवठा निरीक्षकांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी 33 टन तांदूळ, ट्रक असा 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमदीचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक श्रीकांत चोथे, पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्वर गायकवाड, संतोष माने, नामदेव काळेल, महेश स्वामी, नितीन खोंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.