महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : निलंबित पीएसआय गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ
कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा दणका!
कोल्हापूर : खरा पंचनामा
फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणामध्ये संशयित असलेला पीएसआय गोपाळ बदने याला गुन्हा दाखल झाल्यानंतर निलंबित करण्यात आले होते. आता त्याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मंगळवारी याबाबतचे आदेश काढून बदने याला चांगलाच दणका दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणातले प्रमुख आरोपी प्रशांत बनकर व पीएसआय गोपाळ बदने या दोघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे. व त्यांची कस्टडीही न्यायालयाने पोलिसांना दिलेली आहे. सखोल तपास, व या दोन आरोपींचा एकमेकांशी काही संबंध आहे का हे सर्व तपशील तपासण्यासाठी सरकारी वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला होता.
फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर तरुणीने स्वतःच्या हातावर आरोपींची नावे लिहित आत्महत्येसारखं पाऊल उचललं होतं. तिने यावेळी पीएसआय गोपाळ बदनेने आपल्यावर 4 वेळा अत्याचार केल्याचं म्हटलं होतं, तर दुसरा आरोपी प्रशांत बनकरने आपला मानसिक व शारिरीक छळ केल्याचं लिहिलं होतं. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्हयातील अटक आरोपी गोपाळ बाळासाहेब बदने (पोलीस उपनिरीक्षक, निलंबीत) याने पोलीस दलाचे पुर्ण ज्ञान असताना, बेफिकिरीने, नैतिक अधःपतन व दुर्वर्तन, विकृतपणे पोलीस उपनिरीक्षक पदाचा व अधिकारांचा दुरूपयोग, यासह समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणुक केली. पोलीस उप निरीक्षक पदास अशोभनिय ठरेल असे कृत्य करुन कर्तव्य पालनात व दैनिक जीवनात संशयास्पद वर्तन केले आहे. तसेच नमुद प्रकारे केलेले कृत्य हे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे. त्यामुळे गोपाळ बाळासाहेब बदने यास शासकीय सेवेत यापुढे कर्तव्यार्थ ठेवणे सार्वजनिक व लोकहिताचे दृष्टीकोनातुन उचित होणार नाही. म्हणून निलंबित फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने याला बडतर्फ करण्यात येत असल्याचे महानिरीक्षक फुलारी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. तसेच भारतीय राज्यघटना १९५० मधील अनुच्छेद ३११ (२) (ब) अन्वये दिनांक ०४ नोव्हेंबरपासून "शासकिय सेवेतून बडतर्फ” केल्याचे म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.