Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लांडगा आला रे आला...!राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची अवस्था

लांडगा आला रे आला...!
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची अवस्था

सांगली : खरा पंचनामा

अमुक एक साहेब कोल्हापूरचे आयजी, सांगली, साताऱ्याचे एसपी बदलणार, पंडित साहेब सांगलीला येणार कोल्हापूरचे आयजी फुलारी साहेब होणारे नाशिक शहरचे कमिशनर अशा एक ना अनेक अफवांना सध्या सोशल मिडियावर उत आला आहे. आज आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी पडणार, आज नाही पडली तर दोन दिवसांत नक्कीचे तुमचे साहेब बदली होऊन जाणार अशा चर्चा राज्यातील पोलीस दलात जूनपासून सुरू आहेत. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा (अफवा) ही सध्या तरी लांडगा आला रे आला... उक्तीप्रमाणेच सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र या अफवांमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यात रोज एक नवी चर्चा असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये गृह जिल्हा असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर विधानसभा निवडणूका पार पडल्या. महायुतीचे सरकारही सत्तेवर आले. त्यानंतर लगेचच वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा कंड पिकवला जात होता. पण काही प्रमाणात आयपीएस अधिकाऱ्यांसह राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून दर महिन्यात कोणत्या ना कोणत्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच होते. मात्र सर्वाधिक चर्चेत असलेल्या वरिष्ठ आयपीएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ठराविकच बदल्या करण्यात आल्या.

त्यानंतर जुलैपासून दर प्रत्येक महिन्यातील प्रत्येक शुक्रवार उजाडल्यावर बदल्यांची चर्चा कॅंटीन, हजेरीवर, ग्रुपमध्ये झडू लागली. पण ज्या बदल्यांची अपेक्षा अधिकारी आणि अंमलदार करत होते त्यांच्या बदल्या अजूनही झाल्या नाहीत. अनेकदा अनेकांनी माध्यमातील प्रतिनिधींकडेही याबाबत विचारणा करत आहेत. बदल्यांच्या अफवा सुरू असतानाच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले. त्यानंतर काही दिवस बदल्यांच्या चर्चा (अफवा) थांबल्या. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून संभाव्य पोलीस बदल्या नावाखाली वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे लिहून त्यांना कोणीतरी (महाभागाने) पोस्टिंगही दिले. झाले, आचारसंहिता लागू झाल्यानंतर बदल्यांची थांबलेली चर्चा (अफवा) पुन्हा सुरू झाली.

अनेकांनी (म्हणजे खात्यातीलच) ही यादी सोशल मिडियावरही काॅपी पेस्ट केली. त्यानंतर मात्र वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या चर्चेने (अफवेने) पुन्हा वेग घेतला. काहीजण तर छातीठोकपणे आताच मुंबईतील मित्राशी बोललो हीच यादी आज रात्री प्रसिद्ध होणार आहे असे सांगितले. त्यामुळे आजचा शुक्रवार या बदल्यांच्या चर्चेतच (अफवेतच) निघून गेला. रात्री उशीरापर्यंत बदल्यांची यादी प्रसिद्ध झाली नाही त्यामुळे प्रत्येकजण एकमेकांना पडली का यादी असे प्रश्न विचारताना दिसून येत होता. एकंदरीतच वरिष्ठ आयपीएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या चर्चेची अवस्था लांडगा आला रे आला... प्रमाणे झाल्याचेच चित्र आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.