बालकाचे अपहरण करून त्याची विक्री करणाऱ्या दाम्पत्याला अटक
दोघांचीही पोलीस कोठडीत रवानगी : विश्रामबाग पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील विश्रामबाग चौकातून बालकाचे अपहरण करून त्याची विक्री करणाऱ्या दाम्पत्याला शिराळा येथून अटक करण्यात आली आहे. यापूर्वी यातील एकाला अटक करण्यात आली होती. दोघांनाही पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
इम्तियाज पठाण आणि वसीमा इम्तियाज पठाण अशी त्यांची नावे आहेत. तर यापूर्वी इनायत गोलंदाज याला अटक करण्यात आली होती. विश्रामबाग येथे फुगे विक्री आणि सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांचा काचा पुसणाऱ्या राजस्थानमधील दाम्पत्याचे एक वर्षाचे बालकाचे ऐन दिवाळीत अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिघांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील मुलबाळ होत नसलेल्या एका दाम्पत्यास ते एक लाख ८० हजार रुपयांना विकले होते.
याबाबत बागरी कुटुंबाने पोलिसात तक्रार दिल्यानंतर चार दिवसांत इनायत गोलंदाज याला मिरजेतून अटक केली होती. त्याने पठाण दाम्पत्याच्या सहाय्याने बालक चोरून विकल्याची कबुली दिली होती. पोलिसांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे गावातून अपहरण करून विकलेल्या बालकाची सुटका केली होती.
परंतु गेल्या १० ते १२ दिवसांपासून फरार असणाऱ्या पठाण दाम्पत्याच्या मागावर विश्रामबाग पोलिस होते. दोघे शिराळ्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी उपनिरीक्षक प्रविण कांचन, बिरोबा नरळे, स्नेहल मोरे, पुजा कोकाटे यांचे पथक पाठवून पठाण दाम्पत्यास अटक केली. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.