Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तक्रारदाराशी गैरवर्तन भोवले; २ पोलीस अधिकारी निलंबितडीसीपी दीक्षित गेडाम यांचा दणका

तक्रारदाराशी गैरवर्तन भोवले; २ पोलीस अधिकारी निलंबित
डीसीपी दीक्षित गेडाम यांचा दणका

मुंबई : खरा पंचनामा

दोन गटातील वाद सोडवताना गैरवर्तन केल्याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे तर अन्य ५ पोलिसांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी हे आदेश काढले आहेत.

मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी जोगेश्वरीच्या आनंद नगर येथे दोन समुदायात वाद झाला होता. एका दुकानदारावर दुसऱ्या गटाने हल्ला केला होता. त्या दुकानदाराच्या समर्थनार्थ एका राजकीय पक्षाचे काही कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आले होते. त्याचवेळी एक महिला लैंगिक अत्याचाराची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आली होती.

त्या राजकीय पक्षाच्या नेत्याने त्या महिलेच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. दरम्यान, हे कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या आवारात जमले होते. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश केंगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गायके, पोलीस उपनिरीक्षक बाबू तोटरे, पोलीस उपनिरीक्षक दिपक बर्वे आणि पोलीस शिपाई अजिम झारी यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला होता.

या तक्रारीच्या अनुषंगाने परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले असून ५ पोलिसांविरोधात चौकशी करण्याचे आदेश वांद्रे विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांची ७ दिवसांच्या आत प्राथमिक चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. कायद्याचे ज्ञान अवगत असतानाही या पोलिसांनी केलेले कृत्य हे पोलीस दलास अशोभनीय असून त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यांचे कृत्य हे पोलीस दलास काळिमा फासणारे आहे आणि त्यांची सचोटी संशयास्पद असल्याचेही या आदेशात म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.