विरोधकांच्या आरोपांना केराची टोपली दाखवणार
मतदार यादीत बदल न करताच निवडणूक आयोग महत्त्वाची घोषणा करण्याच्या तयारीत
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. कारण, राज्य निवडणूक आयोगाकडून मंगळवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेत पहिल्या टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. राज्यातील या निवडणुका तीन टप्प्यात होण्याची चिन्हं आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका, 42 नगरपंचायतीची निवडणूक पार पडणार आहे. 21 दिवसात निवडणूक प्रक्रिया पार पडताना तात्काळ दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सुद्धा घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते. तर शेवटच्या टप्प्यात महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तसे घडल्यास संबंधित निवडणूक क्षेत्रात आजपासूनच आचारसंहिता लागू होऊ शकते. विरोधकांनी गेल्या काही दिवसांमध्ये मतदार यादीतील घोळाबाबत राज्यभरात रान उठवले होते. निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. मात्र, या सगळ्या आरोपांना आणि आक्षेपांना केराची टोपली दाखवत निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, अशी शक्यता तुर्तास दिसत आहे.
आज उच्च न्यायालयात मतदार यादीतील घोळाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयात यासंदर्भात 28 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मतदार यादीतील घोळ, दुबार नावे आणि अन्य त्रुटींवर बोट ठेवत विरोधकांनी राज्य निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले होते. दुबार आणि खोट्या मतदारांची नावं मतदार यादीतून वगळल्यानंतरच निवडणूक घ्यावी, अशी भूमिका विरोधकांनी घेतली होती. त्यासाठी आज विरोधकांचे एक शिष्टमंडळ दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. या सगळ्याबाबत कोणताही अंतिम निष्कर्ष निघाला नसताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यास विरोधक काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.
याबाबत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाराजी व्यक्त केली. मतदार यादीतील घोळ हा फक्त राजकीय पक्षांपुरता मर्यादित असलेला प्रश्न नाही. लोकशाहीत निष्पक्ष पद्धतीने निवडणुका होणे गरजेचे आहे. संविधानाने घटनात्मक यंत्रणांना अधिकार दिले आहेत, तसेच त्यांच्या काही जबाबदाऱ्याही आहेत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.