Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणात आठ पोलिसांवर खुनाचा गुन्हाएसपींकडून निलंबनाची कारवाई

पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणात आठ पोलिसांवर खुनाचा गुन्हा
एसपींकडून निलंबनाची कारवाई

अमरावती : खरा पंचनामा 

अमरावती येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. चांदुररेल्वे पोलीस स्टेशनच्या कोठडीत रितेश मेश्राम यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ८ पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. आता अमरावतीच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी मोठी कारवाई केली आहे. न्यायालयीन चौकशी अहवालाच्या आधारे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या 8 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी ठरलेल्या तत्कालीन ठाणेदार अजय अहिरकर यांच्यावरही प्रशासकीय कारवाई करण्यासाठी वरिष्ठांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 

अमरावती जिल्ह्यातील चांदुररेल्वे येथील रहिवासी असलेल्या रितेश मेश्राम यांचा मृत्यू पोलिसांच्या ताब्यात असतांना झाला होता. ही घटना 5 जून 2024 रोजी घडली. पोलिसांनी रितेशला संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. रितेशचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला म्हणून कुटुंबीयांनी पोलिसांवर मारहाणीचा आणि चुकीच्या वर्तणुकीचा थेट आरोप केला होता व न्यायाची मागणी केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल अनुसूचित जाती आयोगाने घेतली. आयोगाने स्वतः हस्तक्षेप करत सखोल चौकशी केली. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या वर्तणुकीमुळे रितेशचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष आयोगाने काढले आणि त्यानंतर न्यायालयासमोर अहवाल सादर केला.

गार्ड इंचार्ज आणि गार्ड ड्युटीवर असलेल्या पोलीस अंमलदारांना न्यायालयीन चौकशी अहवालात रितेश मेश्राम यांच्या मृत्यूसाठी दोषी ठरविण्यात आले. कोर्टाने आदेश दिल्यानंतर अखेर 2 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस अधिकाऱ्यासह आठ अंमलदारांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (खुनाचा गुन्हा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तातडीने कारवाई करत आठही पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. यात राजकुमार मुलामचंद जैन, विशाल मुकुंदराव रंगारी, अश्विनी शामरावजी आखरे, सरिता वैद्य, प्रविण रामदास मेश्राम, अलीम हकीम गवळी, अमोल अमृतराव घोडे, प्रशांत ढोके, तत्कालीन ठाणेदार अजय अहिरकर असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.