सांगलीत मद्यधुंद कार चालकाचा ‘हिट अँड रन’चा थरार
चार ते पाच वाहनांना उडवले; बाराजण जखमी; जमावाने कार फोडली
सांगली : खरा पंचनामा
शहरातील कल्पतरू मंगलकार्यालय ते रेल्वे स्टेशन रोडवर मद्यधुंद कार चालकाचा 'हिट अँड रन'चा थरार पाहायला मिळाला. एका मद्यधुंद कार चालकाने विरूद्ध दिशेने येत समोरून येणाऱ्या चार ते पाच वाहनांना जोराची धडक दिली. या अपघातात दहा ते बारा जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच चालकाला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, संतप्त झालेल्या नागरिकांनी कारची तोडफोड केली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एक कार चालक भरधाव वेगात कॉलेज कॉर्नर ते कल्पतरू मंगल कार्यालय रस्त्यावरून निघाला होता. यावेळी या चालकाने नशेत चुकीच्या दिशेने गाडी चालवून समोरून येणाऱ्या प्रत्येक वाहनाला जोराची धडक दिली. यात काही चारचाकी आणि दुचाकींचे नुकसान झाले तर पाच ते सहा जण जखमी झाले. गाडीचे एअर बॅग उघडल्याने चालक बचावला.
परिसरातील नागरिक तसेच वाहनधारकांनी गाडीचा पाठलाग करून चालकाला पकडले. यावेळी संतप्त झालेल्या जमावाने त्याच्या कारची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, मद्यधुंद चालकाच्या 'हिट अँड रन'च्या थरारामुळे अनेकांच्या अंगाचा थरकाप उडाला. त्याचे व्हिडिओ रात्री उशीरा समाज माध्यमांवर व्हायरल झाले. जखमीवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री उशीरापर्यंत त्यांची नावे समजू शकली नाहीत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.