सांगलीत सराईत दुचाकी चोरट्याला अटक : तीन गुन्हे उघड
3.10 लाखांच्या 5 गाड्या जप्त : एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील आरग, एरंडोली येथून दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणत 3.10 लाखांच्या पाच गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. सांगली एलसीबीने ही कारवाई केली.
ऑग्हंन जयपाल शेटे (वय २६, रा. व्यंकोचीयाडी, लिंगनूर रोड, एरंडोली ता. मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत होते.
पथकातील सुशील मस्के यांना एक तरुण चोरीची दुचाकी घेऊन जुना धामणी रस्ता परिसरात थांबल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे जाऊन शेटे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केल्यावर त्याने ती आरग येथील साखर कारखाना परिसरातून चोरल्याची कबुली दिली. कसून चौकशी केल्यावर त्याने चोरीच्या अन्य दुचाकी एका पत्र्याच्या शेडमध्ये लावल्याचे सांगितले. पथकाने तेथून चार दुचाकी जप्त केल्या. त्याला अटक करून मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील, अतुल माने, प्रकाश पाटील, सुशील मस्के, श्रीधर बागडी सुमित सुर्यवंशी, ऋतुराज होळकर, सायबर पोलीस ठाण्याकडील कैप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.