Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"यावेळी मी एकटी नाही."विनेश फोगटचा निवृत्तीतून यू- टर्न !

"यावेळी मी एकटी नाही."
विनेश फोगटचा निवृत्तीतून यू- टर्न !

दिल्ली : खरा पंचनामा

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली होती. पण ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी तिने निवृत्तीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत विनेशने ५० किलोग्रम वजनी गटातील अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तिचं एक पदक निश्चित होतं, त्यावेळचा तिचा फॉर्म पाहता तिला सुवर्ण पदकासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण अंतिम सामन्याच्या दिवशी वजन केलं असता, वजनात १०० ग्रॅम फरक जाणवला. त्यामुळे तिला स्पर्धेतून बाहेर करण्यात आलं होतं. या धक्यातून बाहेर येण्यासाठी बराच वेळ लागला होता. त्यावेळी तिने निवृत्तीची घोषणा केली होती. पण आता तिने पोस्ट शेअर करून निवृत्तीतून बाहेर येऊन देशासाठी पदक जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
विनेश फोगटने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, 'लोकं मला पॅरिस ऑलिम्पिकनंतर हा माझा शेवट असेल का? असं विचारत होते. मी बराच काळ या प्रश्नाचं उत्तर दिलं नव्हतं. मला मॅटपासून, अपेक्षांपासून, दबावापासून आणि माझ्या स्वतःच्या महत्वकांक्षेपासून दूर जायचं होतं. माझ्या प्रवासात काय अडथळे आहेत, हे समजून घेण्यासाठी मला वेळ लागला. मला अजूनही हा खेळ आवडतो, त्यामुळे मला अजूनही स्पर्धा करायची आहे.', असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तसेच तिने पुढे लिहिले की, 'माझ्या मनातील ती आग कधीच विझली नव्हती. ती केवळ थकवा आणि आवाजामुळे दडून बसली होती. शिस्त, दिनचर्या, लढण्याची तयारी हे सर्व माझ्या व्यवस्थेत रुजलं आहे. मी कितीही दूर जाण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील माझा एक भाग नेहमी मॅटवर स्पर्धेसाठी तयार राहतो. म्हणूनच मी निर्भय मनाने लॉस एंजेलिस २०२८ (LA28) च्या दिशेने परत पाऊल टाकत आहे. पण यावेळी मी एकटी नाही. माझा मुलगाही मला पाठिंबा देण्यासाठी सोबत आहे. आमचा छोटा चीअरलीडर ही माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे.'

विनेश फोगटचा जन्म हरियाणात झाला. लहानपणापासूनच तिला कुस्ती खेळण्याची आवड होती. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने २ कांस्यपदकाची कमाई केली होती. तर आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये तिने १ सुवर्ण आणि कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.