'आता गद्दाराला जाऊन विचारा 'काय धाडी, काय पोलीस...'
मुंबई : खरा पंचनामा
'आपल्यातला एक गद्दार गेला त्याचा काय झाडी काय डोंगर वगैरे हा डायलॉग फेमस झाला होता. पण आता त्याला जाऊन विचारा कारण त्याच्यावर ईडीची धाड पडली आहे. आता म्हण 'काय धाडी, काय पोलीस आणि जा आता तुरुंगात', असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी शिंदेंची शिवसेना भाजप आमने-सामने आले आहेत. अशातच 30 नोव्हेंबर रोजी शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर भरारी पथकाने धाड टाकली. त्यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतल्याने शहाजीबापूंसह प्रचंड नाराज झाले असून त्यांनी आपली भाजपविरोधात उघड नाराजी व्यक्त केली.
याच सर्व पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरेंच्या शिसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, मला आजपर्यंत अशी एक निवडणूक दाखवा की शिवसेनेने पैसे देऊन मतं विकत घेतली. पण आता नगरपरिषद निवडणूक बघा, सगळीकडे पैसे फेकून मतं विकत घेतली जातायत.
कोकणात पैसे सापडत आहेत. जो पकडून देतो त्याच्यावरच गुन्हा दाखल करतायत. जयकुमार गोरे म्हणतात की नवरा तुम्हाला शंभर रुपये देत नव्हता, देवाभाऊ पंधराशे रुपये महिलांना देत आहे. तुम्ही काय नवरा बायकोमध्ये आता भांडणं लावत आहात का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
दरम्यान, यावेळी शहाजीबापू यांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले, 'आपल्यातला एक गद्दार गेला त्याचा डायलॉग फेमस झाला होता, 'काय झाडी काय डोंगर...', आता त्याला जाऊन विचारा. कारण त्याच्यावर ईडीची धाड पडली आहे. आता म्हण 'काय धाडी, काय पोलीस आणि जा तुरुंगात', असं म्हणत त्यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका केली.
दरम्यान, यावेळी त्यांनी नाशिकमध्ये साधुग्रामसाठी 1700 हून जास्त झाडं कापण्याच्या निर्णयावर देखील वक्तव्य केलं. मला नाशिकच्या लोकांनी फोन केला की आता काय करायचं? त्यावर मी त्यांना म्हटलं तपोवनातली झाडं भाजपात गेली अशी बातमी द्या, म्हणजे झाडांची कत्तल थांबेल, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.