पोलीस अधीक्षक कार्यालयातील लेखा शाखेत मोठा 'घोटाळा'
पत्नीसह मुख्य सूत्रधार जाळ्यात
रायगड : खरा पंचनामा
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या लेखा शाखेत कोट्यवधी रुपयांच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गैरव्यवहारामागे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक राम जाधव यांचा मुलगा राजेश राम जाधव हा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले आहे.
अलिबाग पोलिसांनी राजेश जाधव आणि त्यांची पत्नी रिया जाधव यांना अटक करून अलिबाग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर साळे यांनी दिली.
राजेश जाधव यांची नियुक्ती सन 2021 मध्ये रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या लेखा विभागात झाली होती. माजी पोलीस अधीक्षक अशोक दुधे आणि सोमनाथ घार्गे यांच्या कार्यकाळात हा प्रकार उघडकीस आला नव्हता. मात्र विद्यमान पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे पोलीस पाटील मानधनासंदर्भातील फाईल स्वाक्षरीसाठी आली असताना त्यात काही गंभीर अनियमितता आढळून आली. त्यानंतर त्यांनी लेखा विभागाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. या चौकशीत तब्बल 1 कोटी 78 लाख 29 हजार 300 रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले.
फिर्यादी संदीप सखाराम जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राजेश जाधव यांनी रायगड जिल्ह्यातील पोलीस पाटील मानधन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केला. बनावट पोलीस पाटीलांची नावे तयार करणे, खोटी हजेरी दाखवणे आणि बनावट देयके कोषागारातून मंजूर करून ती रक्कम स्वतःच्या तसेच इतर खात्यांमध्ये जमा करण्यात आली. आरोपीची पत्नी रिया जाधव हिने स्वतः पोलीस पाटील नसतानाही पात्र असल्याचे दाखवून सुमारे 1 कोटी 5 लाख 96 हजार रुपये काढल्याचा आरोप आहे.
चौकशीत काही पोलीस पाटील यांच्या नावाने वारंवार देयके काढण्यात आली, अस्तित्वात नसलेल्या व्यक्तींची नावे यादीत टाकण्यात आली आणि मानधन थेट वैयक्तिक खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 247/2025 नोंदवण्यात आला असून संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू असून सर्व संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्पष्ट केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.