मंदिर, घर फोडून ऐवज लंपास करणाऱ्या दोघांना अटक : 17.06 लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील तीन गुन्हे उघड : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मंदिर, घरे फोडून त्यातील ऐवज लंपास करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील तीन गुन्हे उघडकीस आणत 17.06 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगली एलसीबीने ही कारवाई केली.
अक्षय अर्जुन मोरे (वय २८, रा. गोंदिलवाडी, आमणापुर, ता. पलूस, जि. सांगली), संभाजी राजाराम जाधव (वय ३०, रा. विकास कारखाना, पलूस, ता. पलुस, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 25 डिसेंबर रोजी सांगलीतील राम मंदिरजवळ राहणारे सम्राट माने यांच्या घरी चोरी झाली होती. यातील चोरट्याना पकडण्यासाठी एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथक तयार केले होते. पथकातील सुशील मस्के यांना दोघेजण चोरीची भांडी, दागिने विक्री करण्यासाठी सांगलीवाडी येथील एका मंगल कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली.
पथकाने तेथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी शिरोळ आणि रत्नागिरी शहरातील मंदिर फोडून तेथून दागिने चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून त्यांच्याकडून दुचाकी, चोरीचे दागिने असा 17.06 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर मंदिर फोडल्याचे आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना सांगली शहरपोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, हणमंत लौहार, संजय पाटील, सुर्यकांत सांळुखे, अतुल माने, सुशिल मस्के, अभिजीत ठाणेकर, ऋतुराज होळकर, प्रमोद साखरपे, सोमनाथ पतंगे, सुमित सुर्यवंशी, रोहन घस्ते, सुनिल जाधव, शिवाजी शीद, सुशांत चिले, गणेश शिंदे, सायबर पोलीस ठाण्याचे अभिजीत पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.