शिवसेनेच्या माजी आमदाराला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
नंदूरबार : खरा पंचनामा
नंदूरबार शहरात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना नंदूरबार शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर दरोडा आणि अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल असून, त्याच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
अटकेनंतर माजी आमदार शिरीष चौधरी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात चौधरी यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील काही आरोपींनाही पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे नंदूरबारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.
दरम्यान, शिरीष चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश चौधरी यांना उपनगराध्यक्षपद मिळाल्यानंतर काढण्यात आलेल्या विजय मिरवणुकीदरम्यान वाद उफाळून आला होता. याच रात्री शिरीष चौधरी यांच्या घरावर तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. विजय मिरवणुकीतील राड्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
या प्रकरणावर माजी मंत्री व शिरीष चौधरी यांचे कट्टर विरोधक अनिल पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. "नंदूरबारमध्ये सुरू असलेली गुंडशाही सहन केली जाणार नाही," अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. मिरवणुकीच्या नावाखाली दहशत निर्माण करणे, अंगप्रदर्शन, चिथावणीखोर हावभाव करणे तसेच भरवस्तीत जातिवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप त्यांनी माजी आमदार चौधरी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर केला होता.
इतकेच नव्हे तर शिरीष चौधरी यांच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा आरोप करत, गुजरातमध्ये बनावट दारू विक्री आणि खंडणीसारख्या गुन्ह्यांमध्ये हे कुटुंब गुंतल्याचा दावाही अनिल पाटील यांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणामुळे नंदूरबारमध्ये राजकीय तणाव वाढला असून, पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.