गोळीबार प्रकरणी 'केआरके'ला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार अभिनेता व सोशल मीडिया व्यक्तिमत्त्व कमाल आर. खान (KRK) यांच्याशी संबंधित पिस्तूल फायरिंग प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी KRK यांना अटक करून वांद्रे येथील हॉलिडे कोर्टात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 27 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, उत्तर प्रदेशातून जारी करण्यात आलेले परवानाधारक पिस्तूल KRK यांच्याकडे तब्बल 20 वर्षांपासून होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या काळात हे शस्त्र काही काळासाठी जमा करण्यात आले होते. निवडणुका संपल्यानंतर पिस्तूल KRK यांना परत देण्यात आले. मात्र, पिस्तूल साफ करत असताना दोन राऊंड फायर झाले, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी एक कार्टिज (खोका) सापडल्याचेही पोलिसांनी कोर्टात सांगितले.
ही घटना मुंबईतील वांद्रे परिसरात घडल्याचे समजते. नेमकी तारीख आणि वेळ पोलिस तपासाअंती स्पष्ट होणार आहे. दोन वेगवेगळ्या इमारतींवर फायरिंग झाल्याचा दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला आहे.
या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून KRK यांचे नाव समोर आले आहे. मात्र, त्यांच्या वकिलांनी वेगळी भूमिका मांडत, फायरिंग करणारी व्यक्ती अनोळखी असल्याचा दावा केला आहे.
फायरिंगमागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. पोलिसांनी कोर्टात सांगितले की, सध्या कोणताही ठोस हेतू समोर आलेला नाही. दुसरीकडे, KRK यांनी आपण कोणतीही जाणूनबुजून फायरिंग केलेली नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, फेसबुकवर केलेल्या कमेंट्समुळे फिल्म इंडस्ट्रीतील काही लोक त्यांना लक्ष्य करत आहेत आणि त्यातूनच आपल्याला गोवण्याचा प्रयत्न होत आहे.
KRK यांच्या वकिलांनी सांगितले की, दोन वेगवेगळ्या फ्लॅट्सवर फायरिंग झाल्याचा आरोप आहे, मात्र त्या दोन इमारतींमधील अंतर सुमारे 400 मीटर आहे, तर संबंधित पिस्तूलची रेंज केवळ 20 मीटर आहे. त्यामुळे हा आरोप तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याचा दावा बचाव पक्षाने केला. तसेच, KRK यांच्याकडे वैध शस्त्र परवाना असून ते एक प्रसिद्ध व्यावसायिक आहेत, असेही न्यायालयात नमूद करण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.