सोलापुरात उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन तरुणाचा खून
भाजप उमेदवारासह 5 जणांना अटक, 15 जणांविरुद्ध गुन्हा
सोलापूर : खरा पंचनामा
महापालिकेच्या प्रभाग 'दोन-क'मधील सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भाजपने माजी नगरसेविका शालन शंकर शिंदे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर उमेदवारी अर्ज माघारीवरून निर्माण झालेल्या वादातून बाळासाहेब सरवदे या तरुणाचा खून झाला.
या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या उमेदवार शालन शिंदेंसह पाच जणांना ताब्यात घेतले असून १० जण फरार आहेत. जेलरोड पोलिस ठाण्यात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत तपास करीत आहेत. भाजपकडून बी-फॉर्म मिळाल्यानंतर शंकर शिंदे व शालन शिंदे यांनी विरोधातील रेखा दादासाहेब सरवदे यांच्यावर उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. यावेळी चुलत भाऊ दादासाहेब सरवदे यांची बाजू घेत बाळासाहेब सरवदे वादात उतरले. या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाले. घटनास्थळावरून तलवारी, कोयते, चाकू व काठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
समाजातील प्रत्येकाला पाच वर्षांची संधी देण्याचे ठरले असतानाही शालन शिंदे यांनी पुन्हा उमेदवारी मागितली आणि पक्षाने त्यांनाच बी-फॉर्म दिला. त्यामुळे नाराज झालेल्या रेखा दादासाहेब सरवदे यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. विशेष म्हणजे सरवदे व शिंदे ही दोन्ही कुटुंबे जवळची नातेवाईक असून भाजपचे कार्यकर्तेच आहेत. उमेदवारीवरून गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता.
समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हा वाद तीन वेळा मिटवला होता; मात्र शुक्रवारी (ता. २) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी शंकर शिंदे व बाळासाहेब सरवदे यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला आणि त्यात बाळासाहेबाचा खून झाला. मयत बाळासाहेब सरवदे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा युवक पदाधिकारी होता. घटनेनंतर मार्कंडेय रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटल परिसरात नातेवाईकांचा आक्रोश आणि मोठी गर्दी पाहायला मिळाली. भावाला न्याय मिळावा, अशी मागणी करताना बाजी सरवदे भावूक झाले होते.
बाळासाहेब सरवदे (रा. जोशी गल्ली, जुना बोरामणी नाका) हा मनसे युवक संघटनेचा पदाधिकारी होता. त्याला दोन लहान मुली असून नववर्षाच्या सुरुवातीला, १ जानेवारी रोजी मोठ्या मुलीचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला होता. मात्र वडिलांनी साजरा केलेला तो वाढदिवस शेवटचा ठरला. ही आठवण काढत नातेवाईक रुग्णालयाबाहेर आक्रोश करीत होते.
शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास शंकर शिंदे यांच्याघराजवळ थांबल्यावर त्याठिकाणी येऊन 'आम्ही जिंकलो' असे म्हणून अमर शंकर शिंदे व ईश्वर बाबू शिंदे ओरडत होते. त्याचा जाब विचारल्यावर त्यांनी तुम्हाला मस्ती आलीय म्हणून वाद सुरु केला. त्यावेळी संशयित आरोपी त्याठिकाणी आले. त्यांच्या हातात कोयता, चाकू, तलवारी, काठ्या होत्या. त्यांनी बाळासाहेबाला मारहाण सुरु केली. त्याचवेळी शारदा तानाजी शिंदे व शालन शंकर शिंदे या दोघींनी बाळासाहेबाच्या डोळ्यात चटणी टाकली. त्यावेळी राहुल राजु सरवदे, सुनील शंकर सरवदे व तानाजी बाबू शिंदे, विशाल शंकर शिंदे यांनी त्याच्यावर वार केले. त्यात बाळासाहेब जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला, असे बाजीराव सरवदे यांच्या फिर्यादीत नमूद आहे. या खून प्रकरणात काहींनी बाजीला पकडून ठेवले आणि बाळासाहेबाचा खून केल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.
भाजपच्या उमेदवार शालन शंकर शिंदे यांच्यासह अमर शिंदे (२८), आतिष शिंदे (२६), तानाजी शिंदे (४६) आणि राहुल सरवदे (३२) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या भांडणात आतिषच्या डोळ्याजवळ तर राहुलच्या पोटावर जखम झाली आहे. खुनाच्या गुन्ह्यात अमर शंकर शिंदे, विशाल शंकर शिंदे, अतिष शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, राहुल राजु सरवदे, ईश्वर सिद्धेश्वर शिंदे, रोहित राजू सरवदे, तानाजी बाबू शिंदे, महेश शिवाजी भोसले, शंकर बाबू शिंदे, अनिल शंकर शिंदे, शालन शंकर शिंदे, शारदा तानाजी शिंदे, आलोक तानाजी शिंदे व विशाल संजय दोरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.