Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मृत्यूनंतरही दोन शिक्षकांना लावली 'इलेक्शन ड्यूटी', अन् वरून कारणे दाखवा नोटीस !

मृत्यूनंतरही दोन शिक्षकांना लावली 'इलेक्शन ड्यूटी', अन् वरून कारणे दाखवा नोटीस !

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवंगत शिक्षकांवर महापालिका निवडणुकीसाठी मतदान अधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अशातच आता या दोन शिक्षकांना कारणे दाखवा नोटीसदेखील बजावण्यात आली आहे.

या प्रकारानंतर प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. या घटनेनंतर राज्य शिक्षक सेनेसह सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाकडून पैठण तालुक्यातील संभाजी कर्डिले आणि राजेश बसचे यांची मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, कर्डिले यांचे तीन महिन्यांपूर्वी, तर राजेशबसचे यांचे १३ महिन्यांपूर्वी निधन झाले. असे असतानाही त्यांना निवडणुकीच्या कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर चुकीची उपरती न झालेल्या प्रशासनाने आता या मृत कारणे दाखवा नोटीस बजावत हलगर्जीपणाचा कळस गाठला.

या शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली. निवडणूक कामात हलगर्जीपणा दाखवल्याबाबतचा खुलासा नोटीस मिळाल्यापासून २४ तासांच्या आत सादर करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी इशारा या पत्रातून देण्यात आला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या कामासाठी मतदान अधिकारी-1 म्हणून आपली नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर बाबतचे आदेश आपणांस देण्यात आले होते. तरी सुद्धा आपण प्रशिक्षणास गैरहजर होता. या बाब ही गंभीर स्वरुपाची असून निवडणूक कामात अडथळा निर्माण करणारी आहे, असं या पत्रात म्हटलं आहे.

तसेच निवडणूक कामात हलगर्जीपणा दाखविल्या बाबत किंवा वरिष्ठांचे आदेश न पाळल्याबाबत आपणांविरुध्द कारवाई का करण्यात येऊ नये? या बाबतचा खुलासा ही नोटीस मिळाल्यापासून 24 तासाचे आत सादर करावा, अन्यथा आपले काहीही महणणे नाही असे गृहीत धरुन आपणांविरुध्द कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असा इशाराही या पत्रात देण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.