डोंबिवलीत मतदानापूर्वी 'हायव्होल्टेज ड्रामा'
शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना पोलिसांनी रात्रीच उचललं
डोंबिवली : खरा पंचनामा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार थंडावल्यानंतर मंगळवारी रात्री डोंबिवलीत मोठी राजकीय खळबळ उडाली. प्रभाग क्रमांक २९ मधील भाजप उमेदवाराच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांना अटक केली आहे.
या कारवाईमुळे संतप्त शिवसैनिकांनी शास्त्रीनगर रुग्णालयाबाहेर प्रचंड गोंधळ घातल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना पोलिसांनी अटक केल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला असून कल्याण-डोंबिवलीतील वातावरण चांगलंच तापलं आहे.
गेल्या रविवारी प्रभाग २९ च्या भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत रवी पाटील आणि नितीन पाटील यांनी त्यांना मारहाण केली होती. या हल्ल्यात ओमनाथ नाटेकर गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी १० ते १२ जणांवर गुन्हे दाखल केले होते.
मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता प्रचार संपल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत दोन्ही उमेदवारांना ताब्यात घेतले. अटकेच्या प्रक्रियेदरम्यान दोघांचीही प्रकृती खालावल्याने त्यांना रात्री उशिरा डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली असून त्यात उमेदवारांच्या मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे.
कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी तुकाराम नगर आणि रुग्णालय परिसरात जवळपास २०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर अटक झाल्याने हे दोन्ही उमेदवार स्वतःचे मतदान करू शकणार का? याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.