Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजप खासदाराच्या घरी चोरी; लाखोंची रोकड लंपास

भाजप खासदाराच्या घरी चोरी; लाखोंची रोकड लंपास

मुंबई : खरा पंचनामा

अभिनेते, गायक आणि भाजपचे खासदार मनोज तिवारी यांच्या मुंबई इथल्या घरी चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी एका माजी कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. मनोज तिवारी यांच्या अंधेरी पश्चिम इथल्या शास्त्रीनगरमधील सुंदरबन अपार्टमेंटमध्ये ही चोरी झाली.

त्यांच्या फ्लॅटमधून 5.40 लाख रुपयांची रोकड चोरीला गेली. याप्रकरणी मनोज तिवारी यांचे मॅनेजर प्रमोद पांडे यांनी अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरेंद्र कुमार दीनानाथ शर्मा या माजी कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी मनोज तिवारी यांनी त्याला कामावरून काढून टाकलं होतं.

तक्रारीनंतर पोलिसांनी जेव्हा घरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, तेव्हा आरोपीची ओळख पटली. तपासात असं आढळून आलं की चोराने फ्लॅटमध्ये प्रवेश करण्यासाठी डुप्लिकेट चाव्यांचा वापर केला होता. अंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडे गेल्या 20 वर्षांपासून मनोज तिवारी यांचे मॅनेजर म्हणून काम करत आहेत. त्यांच्या तक्रारीत पांडे यांनी म्हटलंय की, एका खोलीत ठेवलेले 5.40 लाख रुपये गायब झाले होते. या रकमेपैकी 4.40 लाख रुपये जून 2025 मध्ये कपाटातून गायब झाले होते. त्यावेळीही पोलिसांकडे तक्रार केली होती, परंतु त्यावेळी गुन्हेगाराचा शोध लागला नव्हता.

डिसेंबर 2025 मध्ये मनोज तिवारी यांच्या निवासस्थानी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. 15 जानेवारी 2026 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास रेकॉर्ड केलेल्या फुटेजमध्ये माजी कर्मचारी रोख रक्कम चोरताना दिसत होता. या फुटेजमध्ये असंही दिसून आलं की आरोपी घर, बेडरुम आणि कपाटाच्या डुप्लिकेट चाव्या घेऊन जात होता. त्याने त्या रात्री सुमारे एक लाख रुपये चोरले होते.

सीसीटीव्ही फुटेजमधून ओळख पटल्यानंतर अखेर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. यासंदर्भात पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली, त्यानंतर आंबोली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी मनोज तिवारी यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

भोजपुरी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय गायक आणि अभिनेता म्हणून काम केल्यानंतर मनोज तिवारी यांनी 2009 मध्ये पहिली निवडणूक लढवली होती. समाजवादी पार्टीच्या तिकिटावर त्यांनी ही निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.