गँगस्टर अरुण गवळींना डबल झटका; डॅडीच्या दोन्ही मुलींचा निवडणुकीत पराभव
मुंबई : खरा पंचनामा
कुख्यात गुंड आणि राजकारणी बनलेले अरुण गवळी यांच्या दोन्ही मुलींचा मुंबई महानगरपालिकेत पराभव झाल्यामुळे त्यांना दुहेरी झटका बसला आहे. अखिल भारतीय सेनेकडून भायखळा विभागात गीता गवळी आणि योगिता गवळी यांनी अनुक्रमे प्रभाग क्रमांक २१२ आणि २०७ मधून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
प्रभाग २१२ मधून गीता गवळी या २०१७ मध्ये निवडून आल्या होत्या. तर योगिता गवळी यांनी प्रथमच अर्ज भरला आहे. योगिता यांनी उमेदवारी अर्ज भरलेल्या प्रभाग क्रमांक २०७ मधून २०१२ मधील निवडणुकीत त्यांची काकी वंदना गवळी निवडून आल्या होत्या. तर २०१७ मधील निवडणुकीत त्या पराभूत झाल्या होत्या. निवडणुकीपूर्वी वंदना गवळी यांनी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला होता.
प्रभाग २१२ मध्ये समाजवादी पार्टीच्या अमरीन शेहझाद यांनी गीता गवळी यांचा २,०२५ मतांनी पराभव केला. शेहझाद या मुंबई सेंट्रल (पूर्व) भागातील रहिवासी आहेत. त्यांच्या विजयामुळे प्रभाग २१२ मध्ये समाजवादी पार्टीने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. शेहझाद (समाजवादी पार्टी) ८,८४८ मते, गीता अजय गवळी (अखिल भारतीय सेना) ६,८२३ मते मिळाली. गीता गवळी यांच्या पराभवामुळे प्रभाग क्रमांक २१२ मध्ये अरुण गवळी यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का बसला आहे.
अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी या अभिनेते आणि माजी बिग बॉस स्पर्धक अक्षय वाघमारे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना भाजपाचे उमेदवार रोहिदास लोखंडे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
२००४ च्या विधानसभा निवडणुकीत अखिल भारतीय सेनेचे संस्थापक अरुण गवळी यांनी चिंचपोकळी मतदारसंघातून विजय मिळवला होता. तेव्हापासून चिंचपोकळी आणि भायखळ्यात गवळींच्या पक्षाचे वर्चस्व होते. २००२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांचे उमेदवार सुनील घाटे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्यानंतर २००७ च्या निवडणुकीत अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांनी पहिल्यांदाच विजय मिळवत महानगरपालिकेत प्रवेश केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.