'पोक्सो'च्या आरोपीचा कोठडीत गळफास; पोलिस उपनिरीक्षकासह, तीन कर्मचारी निलंबित
नागपूर : खरा पंचनामा
जरीपटका पोलिसांद्वारे पोक्सोच्या प्रकरणात अटक केलेल्या १९ वर्षीय आरोपीने कोठडीत चादरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.
नागेंद्रकुमार रामजी भारतीया (रा. मदारीपुरा, प्रयागराज, उत्तरप्रदेश) असे मृताचे नाव आहे. नागेंद्रकुमार कामगार असून तो कामाचा शोधात नागपुरात आला होता. दरम्यान त्याची मध्यप्रदेशातून कामासाठी आलेल्या एका कामगाराच्या कुटुंबियांशी ओळख झाली.
काहीच दिवसांनंतर कुमार याचे त्यांच्या १६ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातून भेटीगाठी वाढल्या आणि त्याने तिच्यावर अनेकदा अत्याचारही केला. काही दिवसांपूर्वी कुमार याने लग्नासाठी मुलीला घरातून पळवून नेले.
याबाबत नातेवाईकांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता दोघेही उत्तरप्रदेशातील मदारीपुरा गावात आढळले. त्यांना नागपूरला परत आणल्यावर मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यावर कुमार याच्यावर १९ जानेवारीला गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयासमोर सादर करीत दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळविली.
त्यानंतर त्याला ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले. यादरम्यान त्याची पोलिसांनी चौकशीही केली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास कोठडीजवळ कुणीही नसल्याचे बघितल्यावर त्याने चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी सहा वाजता ही बाब उघडकीस आल्यावर ठाण्यात खळबळ उडाली.
घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्यावर सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर आयुक्त राजेंद्र दाभाडे यांच्यासह परिमंडळ सहाचे पोलिस उपायुक्त संदीप पखाले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाण्यात दाखल होऊन परिस्थितीची पाहणी केली.
प्रेयसीसोबत प्रेमसंबंधातून लग्न करण्याच्या इराद्याने पळून गेल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यास आरोपीची मानसिकता ढासळलेली असते. अत्याचारासारखा भयंकर आरोप असल्यामुळे आरोपी अस्वस्थ असतो. लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर त्याच्या हालचालींवर गार्ड ड्युटी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे लक्ष असायला हवे. मात्र, जरीपटका ठाण्यातील एकाही पोलिस कर्मचाऱ्याने या बाबीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आरोपीच्या मृत्यूस पोलिसच जबाबदार असल्याची चर्चा आहे.
जरीपटका पोलिस ठाण्यात 'पोक्सो' गुन्ह्यातील आरोपीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच, राज्य गुन्हे अन्वेषन विभागाचे पथक ठाण्यात दाखल झाले. त्यांनी तपासणी सुरू केली आहे.
पोलिस उपनिरीक्षकासह, तीन कर्मचारी निलंबित
पोलिस ठाण्यात आरोपीने चादरीने गळफास घेतल्याप्रकरणी पोलिस आयुक्तांनी ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकासह चौघांना निलंबित केले आहे. पोलिस उपायुक्तांकडून तसा निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
पोलिस उपनिरीक्षक नितीन आत्राम, हवालदार अमोल खडसे, राहुल चव्हाण आणि प्रमोद दुधकावळे अशी हवालदारांची नावे आहेत. रात्री ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक नितीन आत्राम यांच्यासह हवालदार अमोल खडसे, राहुल चव्हाण आणि प्रमोद दुधकावळे कर्तव्यावर होते.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस उपायुक्तांनी चौघांचाही निलंबनाचा प्रस्ताव सहआयुक्त रेड्डी यांच्याकडे पाठविला. या प्रस्तावावर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती आहे. त्यातून चौघांचेही निलबंन करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.