Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पूजा खेडकर यांचे हात-पाय बांधले; पुण्यातील हाय-प्रोफाईल दरोड्यात पहिली अटक

पूजा खेडकर यांचे हात-पाय बांधले; पुण्यातील हाय-प्रोफाईल दरोड्यात पहिली अटक

पुणे : खरा पंचनामा

बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या पुण्यातील बंगल्यावर झालेल्या दरोड्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी मोठी कारवाई करत मुंब्यातून एका संशयिताला अटक केली आहे.

खुम्मा दिलबहादूर शाही (वय 40, रा. कौशल, मुंब्रा, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर नुकताच कामाला ठेवण्यात आलेल्या हिकमत या नोकराचा वडील असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

नॅशनल हौसिंग सोसायटीतील पूजा खेडकर यांच्या बंगल्यात हा धक्कादायक प्रकार सुमारे 10 ते 15 दिवसांपूर्वी कामावर लागलेल्या हिकमत यानेच घडवून आणल्याचा संशय पोलिसांना आहे. शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हिकमतने घरातील आई-वडील, रखवालदार, कुक आणि वाहनचालक यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्याच वेळी पूजा खेडकर घरी परतल्या. त्यांना पाहताच आरोपीने त्यांचे हातपाय चिकटपट्टीने बांधले आणि घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा केला.

घरातील सर्वजण बेशुद्ध असल्यामुळे घटनेचा नेमका क्रम कसा घडला, याची सविस्तर माहिती सुरुवातीला मिळू शकली नव्हती. मात्र, सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना एकूण 7 संशयित आरोपी दिसून आले असून तपासाला वेग देण्यात आला आहे.

पोलिस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान हिकमतचा शोध घेत असताना त्याचे वडील खुम्मा शाही हे मुंब्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना अटक केली.

खुम्मा शाही यांची सध्या चौकशी सुरू असून या दरोड्यामागे कोण आहे, चोरीचा माल कुठे गेला आणि इतर आरोपींची भूमिका काय आहे, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून घरगुती नोकरांच्या पार्श्वभूमी तपासणीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.