Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उमेदवारी अर्ज फेटाळलेल्या उमेदवारांना झटका

उमेदवारी अर्ज फेटाळलेल्या उमेदवारांना झटका

मुंबई : खरा पंचनामा

पुढील आठवड्यात होणारी मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांच्या पदरी उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शुक्रवारी निराशाच पडली. विविध कारणास्तव फेटाळण्यात आलेल्या या उमेदवारांचे अर्ज पुन्हा दाखल करून घेण्याची मागणी मान्य करणे हे शेवटच्या क्षणी निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्यासारखे आहे, असे नमूद करून याप्रकरणी दाखल केलेली जनहित याचिका न्यायालयाने फेटाळली.

याचिककर्त्याने केलेली मागणी जनहित याचिकेद्वारे केली जाऊ शकत नाही, हा महापालिका वकिलांचा मुद्दाही न्यायालयाने यावेळी योग्य ठरवला. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक १५ डिसेंबर रोजी जाहीर झाल्याचे आणि पुढील आठवड्यात निवडणूक असल्याचेही न्यायालयाने याचिका फेटाळताना प्रामुख्याने नमूद केले.

मुंबईतील प्रभाग क्रमांक १ ते २२७ चे निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या महापालिका आयुक्तांनी या उमेदवारांचे अर्ज विविध कारणांस्तव फेटाळले होते. तथापि, सत्ताधारी पक्षाला खूश करण्यासाठी हे अर्ज फेटाळले असावेत, असा संशय व्यक्त करून वांद्रेस्थित व्यावसायिक मोझम अली मीर यांनी याप्रकरणी जनहित याचिका दाखल केली होती. तसेच,

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिलेली सात दिवसांची मुदत अत्यंत कमी असल्याचा दावा करून फेटाळलेले उमेदवारी अर्ज पुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.

मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही याचिका सादर करण्यात आली, तेव्हा न्यायालयाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली होती व प्रकरण शुक्रवारी सूचीबद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी, महापालिकेच्या वतीने याचिकेतील मुख्य मागणीबाबत आक्षेप नोंदवण्यात आला आणि जनहित याचिकेद्वारे अशी मागणी केली जाऊ शकत नाही हे न्यायालयाला सांगितले गेले. न्यायालयानेही त्याला सहमती दर्शवली आणि याचिका फेटाळली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.