Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अपघाताचा बनाव करणाऱ्या गुन्ह्याला पोलिसांनी फोडली वाचा! दोघे पोलिसांच्या जाळ्यात : फलटण ग्रामीण पोलीसांची कामगिरी

अपघाताचा बनाव करणाऱ्या गुन्ह्याला पोलिसांनी फोडली वाचा! 
दोघे पोलिसांच्या जाळ्यात : फलटण ग्रामीण पोलीसांची कामगिरी

सौ. शुभांगी सरोदे
सातारा : खरा पंचनामा

अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव करून खून करण्यात आलेला प्रकार हा फलटण तालुक्यात उघडकीस आला आहे. मात्र फलटण ग्रामीण पोलिसांनी अगदी शिताफीने तपास करून अवघ्या चार तासांत या प्रकरणाला वाचा फोडली आहे. यामध्ये परराज्यांत पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन संशयितांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून सस्तेवाडी (ता. फलटण, जि. सातारा) गावचे हद्दीत लोंढेवस्तीनजीक गणेश बाळू मदने (वय 40, रा. सस्तेवाडी) यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाकडूंन फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. मात्र पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केले असता मृत व्यक्तीची मोटरसायकल साईड स्टँडवर सुरक्षित उभी असून तिची चावी पण स्विचलाच असल्याचे निदर्शनास आले. या सर्व बाबींवर पोलिसांना संशय निर्माण झाला होता. 

त्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. मृताच्या नातेवाईकांकडे अधिक चौकशी केली असता काही वेळापूर्वी शेतात ससे पकडण्यासाठी आलेल्या दोन अनोळखी इसमांशी गणेश मदने यांचे भांडण झाल्याची माहिती समोर आली. या तपासातून रोहन कैलास पवार (वय 20, सोमवार पेठ, फलटण) आणि गणेश शंकर जाधव (वय 22, मूळ रा. कलिना मुंबई, सध्या रा. फलटण) पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेवुन त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप जगताप करीत आहेत. 

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जगताप, सहाय्यक निरीक्षक शिवाजी जायपत्रे, उपनिरीक्षक दीपक पवार, मच्छिंद्र पाटील, उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सूर्यवंशी, महादेव पिसे, कल्पेश काशीद, अमोल देशमुख, तुषार नलावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.