१५ तासांचा 'हायव्होल्टेज ड्रामा' संपला; डॉ. संग्राम पाटील अखेर सुटले!
मुंबई : खरा पंचनामा
पहाटेपासून मुंबई विमानतळावर सुरू असलेला तो थरार अखेर संपला आहे. तब्बल १५ तासांच्या चौकशी नाट्यानंतर डॉ. संग्राम पाटील यांची सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांच्या तावडीतून सुटताच ते आपल्या मूळ गावी, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल कडे रवाना झाले आहेत. मात्र, सुटका झाली असली तरी या प्रकरणाला आता एक नवीन कायदेशीर वळण मिळाले आहे.
डॉ. पाटील यांच्यावर भाजप नेत्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. संग्राम पाटील यांच्याकडे 'युनायटेड किंगडम' चे नागरिकत्व आहे. परदेशी नागरिक असल्यामुळेच तांत्रिक अडचणींमुळे भारतीय पोलीस त्यांना अटक करू शकले नाहीत, असा दावा सरोदे यांनी केला आहे.
सरोदे यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. "सत्तेचे सत्य मांडणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी विनाकारण १५ तास अडकवून ठेवले, हा सरळसरळ छळ आहे," असे म्हणत त्यांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला. माझे डॉ. संग्राम पाटलांशी बोलणे झाले असून ते आता सुरक्षित असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पोलिसांनी डॉ. संग्राम पाटलांना जाऊ दिले असले, तरी त्यांच्यावर एक महत्त्वाची अट घालण्यात आली आहे. त्यांना भारत सोडून परत जाताना पोलिसांना भेटूनच जावे लागेल, असे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे डॉ. पाटील सध्या गावी जात असले तरी, परदेशात परतताना त्यांना पुन्हा एकदा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.