मुंबई महापालिकेत नोकरीचे आमिष; महिलेवर गुन्हा
मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूरमधील 43 जणांची 33 लाखांची फसवणूक
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत मुंबई, सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील तब्बल ४३ जणांची सुमारे ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी मुंबई महानगरपालिका (बीएमसी) चे नाव पुढे करून बनावट आश्वासने देण्यात आली. याबाबत कुर्ला पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
सांगलीतील अनिलकुमार गाँजारी (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जून २०२४ मध्ये त्यांची ओळख माया चव्हाण (वय ५९) हिच्याशी नातेवाइकांच्या माध्यमातून झाली. संबंधित महिला मुंबई महापालिकेच्या एल वॉर्ड (कुर्ला) येथे कार्यरत असल्याचे सांगत होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क असल्याचा दावा करत तिने विविध पदांवर नोकरी मिळवून देण्याची हमी दिली.
तक्रारीनुसार, शिपाई, लिपिक, आर.ए. लिपिक आणि हेड क्लार्क या पदांसाठी प्रत्येकी १.७० लाख ते २.५० लाख रुपये घेण्यात येतील, असे सांगण्यात आले. सुरुवातीला अर्ज व फॉर्म फीच्या नावाखाली रक्कम स्वीकारण्यात आली. त्यानंतर उमेदवारांकडून शैक्षणिक व इतर कागदपत्रे मागविण्यात आली. उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घाटकोपर पूर्व येथील पारेख हॉस्पिटलमध्ये केल्याचा आरोप आहे. यासाठी प्रत्येकाकडून १० हजार रुपये रोख घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
ऑगस्ट २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत विविध बँक खात्यांवर ऑनलाइन व्यवहारांद्वारे सुमारे २४ लाख ६८ हजार रुपये वर्ग करण्यात आले. याशिवाय मुंबईत प्रत्यक्ष भेटीदरम्यान ८ लाख ३० हजार रुपये रोख देण्यात आल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे. एकूण फसवणुकीची रक्कम सुमारे ३३ लाखांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
तपासादरम्यान संबंधित महिला महानगरपालिकेत केवळ शिपाई पदावर कार्यरत असल्याचे उघड झाले. इतर संशयितांनी बनावट ओळखपत्रे व शिक्क्यांचा वापर करून स्वतःला अधिकारी म्हणून भासविल्याचा आरोप आहे. या प्रकरणात प्रथमेश चव्हाण, सुरेंद्र गुरव, राहुल जाधव (स्वतःला बीएमसी अभियंता म्हणून सांगणारे) आदींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित महिला सेवानिवृत्त झाल्याची माहितीही समोर आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.