Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एक सकाळ महाराष्ट्राला धक्का देणारी, तर दुसरी सकाळ... अजितदादांबाबत बोलताना उद्धव ठाकरे भावूक

एक सकाळ महाराष्ट्राला धक्का देणारी, तर दुसरी सकाळ... 
अजितदादांबाबत बोलताना उद्धव ठाकरे भावूक

मुंबई : खरा पंचनामा 

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (23 फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या दुःखद निधनाबाबत विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात आला. विधान परिषदेत अजित पवारांच्या शोक प्रस्तावावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, विधिमंडळाचं या वर्षीच पहिलं अधिवेशन आणि या अधिवेशनाची सुरुवात आपण सर्वजण एक दिगमूड अवस्थेमध्ये आहोत. आजपर्यंत नेहमी सभागृहात दिसणारे आणि आपल्याला सर्वांनाच आपले वाटणारे अजितदादा या सभागृहात किंवा या विधिमंडळात आज दिसत नाही, ही खंत आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. माणसं येतात, माणसं जातात, परंतु माणसं असताना त्यांचं महत्त्व आपल्याला कधी कळत नाही आणि ती नसतात त्यावेळेला त्यांचं महत्त्व काढून काही उपयोग होत नसतो. अनेक जण असे असतात जे कधी जवळ असताना कळत नाहीत, पण काही जण असे असतात की, जे जवळ आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित कळतात. या विधिमंडळामध्ये अनेकांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अजितदादांच्या बरोबरीने झाली असेल. काळ एकच आहे. विशेषतः माझ्या कारकर्दीची सुरुवात सुद्धा अजितदादांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या विचारधारणेच्या विरोधातली होती. आम्ही कधी एकत्र येऊ असं ध्यानी मनी सुद्धा वाटलं नव्हतं. अजितदादांच्या बद्दल म्हणायचं झालं तर दोन सकाळ अशा होत्या, त्यातली एक सकाळ ही त्यांच्या कृतीने महाराष्ट्राला धक्का देणारी होती आणि दुसरी सकाळ ही महाराष्ट्राला व अंतकरणाला चटका देणारी होती, असे भाष्य ठाकरे यांनी केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही कधी एकत्र येऊ असं आम्हाला वाटलं नव्हतं. कारण दोन्ही पक्ष हे राजकीय दृष्ट्या एकमेकाच्या विरोधात होते. अनपेक्षितपणाने एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर साहजिकच आहे की, मनामध्ये नाही म्हटलं तरी अडी होती. आधीची सकाळी मी आपल्याला सांगितली आणि त्याच्यानंतर ही व्यक्ती माझ्यासोबत होती. एक तर मला प्रशासनाचा अनुभव नव्हता. अचानक या सभागृहात किंवा या विधिमंडळात आलो, मुख्यमंत्री म्हणून आलो, कामकाज कसं चालवायचं हे माहित नव्हतं. तसेच सहकारी सगळे विरोधातले होते. अशावेळी अजितदादांसारखा एक सहकारी ज्यांनी एक धक्का दिला होता आणि आपल्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून बसणार हे थोडसं त्यावेळेला नाही म्हटलं तरी अनपेक्षित होतं. पण जसं जसं कामकाज सुरू झालं, तेव्हा मला त्यांच्याबद्दल कळलं. ती भावना आजही माझ्या मनात कायम आहे आणि ती नेहमी कायम राहील, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, अजितदादांसारखा एक भरोसेमंद उत्तम दिलदार, केवळ सहकारीच नव्हे तर मित्र मी गमावला आहे. शासकीय किंवा प्रशासकीय कामकाजामध्ये एक खंबीर पाठिंबा आणि मला ते आधार होते. कोणतीही एखादी गोष्ट कळली नाही तर अजितदादांबरोबर मी बोलायचो. विषयाचा सखोल अभ्यास करणारा सहकारी किंवा लोकप्रतिनिधी अभावानेच आढळतात. आज सुद्धा त्यांच वैशिष्ट्य म्हणजे ते सहा वेळा उपमुख्यमंत्री होते. पण विशेष म्हणजे एका मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करणं हे काही जणांना फार अवघड असतं. आयुष्यभर वृक्षाच्या सावलीत राहावं लागतं, वृक्षाच्या सावलीचा आदर घ्यावा लागतो, पण काही जण असे असतात की त्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची एक ओळख निर्माण करतात, त्यातले एक अजित दादा होते, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांच्या बंडखोरीच्या प्रकरणावर भाष्ट केलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.