सर्व शिक्षा अभियानच्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याला 88 हजारांची लाच घेताना अटक
जतमध्ये सांगली एसीबीची कारवाई : उपाधीक्षक इनामदार
सांगली : खरा पंचनामा
जिल्हा परिषद शाळातील वर्ग खोल्या बांधकाम व दुरूस्ती बिलाचे मोजमाप नोंदवही (एम.बी.बुक) तयार करून बिल मंजुरीसाठी सर्व शिक्षा अभियानच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे पाठविण्यासाठी तक्रारदार यांचेकडे मंजुर बिलाचे २ टक्केप्रमाणे 88 हजार रुपयांची लाच घेताना सर्व शिक्षा अभियानच्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यास 88 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगलीच्या पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांनी दिली. याबाबत जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
संजय भगवान सुतार (वय ५१, पद कनिष्ठ अभियंता (कंत्राटी), सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग पंचायत समिती जत) असे अटक केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. यातील तक्रारदार यांनी मजूर संस्थेमार्फत जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळातील वर्ग खोल्या बांधकाम व दुरूस्ती बिलाचे मोजमाप नोंदवही (एम.बी.बुक) तयार करून बिल मंजुरीसाठी कार्यकारी अभियंता, सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली येथे पाठविण्यासाठी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केलेबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार दि. २४ फेब्रुवारी रोजी पथकास दिला होता.
तक्रारदार यांनी दिले लाच मागणी तक्रारी अर्जाचे अनुषंगाने पंचायत समिती जत येथे पडताळणी केली असता सुतार यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. बुधवारी त्यांना जत पंचायत समिती आवारातील विस्तार अधिकारी निवासस्थानाजवळ 88 हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
सांगली एसीबीच्या पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक योगेश चव्हाण, किशोरकुमार खाडे, प्रितम चौगुले, अजित पाटील सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, सीमा माने, सागर नायकुडे, विना जाधव, चालक विठ्ठलसिंग राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.