Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार

निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार

मुंबई : खरा पंचनामा

निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेरील गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोळीबार करणारा आरोपी चालत येऊन इमारतीवर गोळीबार करून निघून गेल्याचं तपासात समोर आलं आहे.

पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक आरोपी चालत येऊन इमारतीसमोर उभा राहून फायरिंग करताना दिसला. आरोपीसोबत अन्य कोणी होतं का याचाही तपास पोलीस करत आहेत. आतापर्यंत केलेल्या प्राथमिक तपासात एकच आरोपी चालत येऊन इमारतीसमोर फायरिंग करून निघून जाताना दिसत आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी बाइकवरून एकटाच जुहू परिसरात आला. रोहित शेट्टीच्या घरापासून काही अंतरावर त्याने बाइक लावली आणि त्यानंतर तो चालत रोहित शेट्टीच्या घरासमोर आला. घरासमोर उभा राहून त्याने चार ते पाच राऊंड फायरिंग केली आणि पुन्हा बाईकवरून निघून गेला. या गोळीबार प्रकरणाची आणि सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाची मोडस ऑपरेंडी सारखीच असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. बिश्नोई गँगचा यामध्ये सहभाग असल्याचा मुंबई पोलिसांना संशय आहे.

रविवारी पहाटे मुंबईतील जुहू परिसरातील रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर इमारतीबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ही घटना घडली तेव्हा रोहित शेट्टी त्याच्या घरी होता की नाही, हे अद्याप कळू शकलेलं नाही. विभागीय पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक याप्रकरणी तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने इमारतीवर पाच राऊंड फायरिंग केली. आरोपींची ओळख पटविण्यासाठी आणि घटनेचा क्रम निश्चित करण्यासाठी पोलीस इमारतीभोवतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासत होते, त्यात धक्कादायक माहिती समोर आली. सध्या रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर कडक पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली असून फॉरेन्सिक टीमदेखील पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचल आहे.

याआधी अभिनेता सलमान खानच्या 'गॅलेक्सी अपार्टमेंट' बाहेर अशाच पद्धतीने अज्ञातांनी गोळीबार केला होता. त्या प्रकरणात बिश्नोई गँगचे गुंड सामील होते. त्यामुळे आता रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेरील गोळीबारप्रकरणीही बिश्नोई गँगचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच खरी परिस्थिती स्पष्ट होईल, असं म्हटलं जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.