ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीसाठी 'एसओपी'च नाही, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत कबुली
मुंबई : खरा पंचनामा
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 3 फेब्रुवारी रोजी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटात खोपोलीजवळ संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास अडोशी बोगद्याजवळ गॅसने भरलेला एक टँकर उलटला होता.
यामुळे तब्बल 33 तास वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत अनेक किलोमीटरपर्यंत 1 लाखांहून अधिक वाहने अडकून पडली होती. वाहनचालकांना आणि प्रवाशांना पाणी, अन्न आणि इतर आवश्यक सुविधांच्या कमतरतेचा सामना करावा लागला होता. यामुळे, प्रवाशांना मोठे हाल सोसावे लागले होते. हाच मुद्दा शनिवारी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा गाजला.
भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीसाठी काही विशिष्ट नियम आहेत का? असा प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत मांडला. मुंबई- पुणे महामार्गावर ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारा एक टँकर उलटल्यामुळे वाहनचालकांसह प्रशासनाची मोठी पंचाईत झाली, असे ते म्हणाले. त्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, 3 फेब्रवारी रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या एका लेनवर प्रोपेलिन गॅसची वाहतूक करणाऱ्या एका टँकरचा अपघात झाला होता.
अपघातात टँकरमधील ज्वलनशील वायूची गळती सुरू झाली होती. या घटनेमुळे वाहतूक काही तास बंद ठेवून मुंबईकडे जाणारी वाहतूक लोणावळा तसेच खोपोली मार्गावर वळवण्यात आली होती. अमित साटम यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने या टँकरची तपासणी करण्यात आली होती. त्याचा योग्य तो परवानाही घेतला होता. त्याची वारंवार तपासणी होत होती. पण, मुंबई - पुणे एक्सप्रेसवर एकेठिकाणी वाहन चालकाचा तोल जाऊन टँकर उलटला. पण या प्रकरणी आपल्या अधिकारी तसेच वाहतूक पोलिसांचे कौतुक केले पाहिजे.
मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, टँकर उलटला पण वायू गळती झाली नाही. ती वायू गळती झाली असती तर फार मोठ्या प्रमाणात मनुष्यहाणी झाली असती. कारण, हा प्रोपेलिन हा वायू फार मोठ्या प्रमाणात ज्वलनशील आहे. त्याची योग्य प्रकारे त्याच ठिकाणी तजवीज करून व्यवस्था करण्यात आली. हा वायू पेटला असता टँकरच्या सभोवतालच्या 500 मिटरच्या परिघात फार मोठी हानी झाली असती. त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे की, त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. पण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन स्थिती मोठ्या हुशारीने हाताळली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही या चर्चेत हस्तक्षेप केला. त्यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. अशा घटना टाळण्यासाठी सरकार हॅझमॅट व्हेईकल यूनिट रस्त्यांवर का? तसेच बोगद्यात आग लागली तर त्या प्रकरणांमध्येही आपण अशी एखादी सोय करणार का? असे ते म्हणाले. त्यावर मंत्री सरनाईक म्हणाले, सरकारने एमएसआरडीसीला असे युनिट्स स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. एमआरडीसीने टोल नाक्यांवर घेण्यात आलेला टोल परत करण्याचाही निर्णय घेतला आहे. भविष्यात ज्वलनशील पदार्थांचा टँकर उलटला तर तो एअरलिफ्ट करता येईल का? यावरही विचार केला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. ते म्हणाले, ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या आपल्या ज्या केंद्रीय कंपन्या आहेत, त्यांच्याकडे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जी उपकरणे हवी होती ती नव्हती. त्यामुळे आपल्याला या घटनेतून एक धडा मिळाला. या प्रकरणी आपल्याकडे एक एसओपीच नाही. ती एवढी वर्षे वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडेही नाही आणि सरकारकडेही नाही. त्यामुळे आपण संबंधित कंपन्यांना ही एसओपी तयार करण्याचे आदेश दिलेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी यावर समाधान व्यक्त केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.