अत्याधुनिक फॉरेन्सीक व्हॅनचा अचुक व कार्यक्षम वापर करा : महानिरीक्षक फुलारी
कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी घेतला सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा आढावा
सोलापूर : खरा पंचनामा
"आधुनिक गुन्हे तपासामध्ये फॉरेन्सिक विज्ञानाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. घटनास्थळी वैज्ञानिक पद्धतीने पुरावे संकलित केल्यास गुन्ह्यांचा तपास अधिक अचूक, जलद व परिणामकारक होण्यास मदत होते, त्याचा अचुक व कार्यक्षम वापर पोलीस घटकांनी करावा", अशा सूचना कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सोलापूर येथे दिल्या.
महानिरीक्षक फुलारी यांच्याहस्ते अत्याधुनिक फॉरेन्सीक व्हॅनचे लोकार्पण तसेच आपत्ती व्यवस्थापन कीटचे वितरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, फॉरेन्सिक वाहनाच्या माध्यमातून घटनास्थळी तात्काळ पोहोचून पुरावे जतन करणे, वैज्ञानिक तपास करणे तसेच गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढविण्यास मोठी मदत होणार आहे.
महानिरीक्षक फुलारी शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची आढावा बैठक घेतली. या बैठकीसाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर अधीक्षक प्रितम यावलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील शाखा प्रमुख यांचेकडून जिल्ह्यातील गुन्हे, गुन्हे निर्गती, गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई तसेच आगामी काळातील बंदोबस्त याचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीमध्ये मागील वर्षामध्ये दाखल असलेल्या महत्वाचे गुन्हे, त्याचा तपास तसेच पंढरपूर येथील यात्रा बंदोबस्त याबाबत सविस्तर माहिती घेवून त्यामध्ये आगामी काळात करावयाच्या बदलाबाबत मार्गदर्शन केले. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ व गुन्हे तपास प्रक्रियेला अधिक वैज्ञानिक बळ देण्याच्या उद्देशाने सविस्तर मार्गदर्शन देखील करण्यात आले.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील ७ उपविभगास प्रत्येकी १ प्रमाणे एकूण ७ फॉरेन्सीक व्हॅन शासनाकडून मिळाल्या आहेत. त्यातील ४ फॉरेन्सीक व्हॅनची शेवटची तुकडी अलिकडेच प्राप्त झाली आहे. सदर फॉरेन्सीक व्हॅनचे उद्घाटन व लोकापर्ण महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्याहस्ते करण्यात आले.
त्याचप्रमाणे सोलापूर आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे आपत्ती व्यवस्थापन किटचे वितरण करण्यात आले. सदर किटचा उपयोग नैसर्गिक आपत्ती, अपघात, बचाव कार्य तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित मदत पुरविण्यासाठी होणार आहे.
यावेळी सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील शाखा प्रभारी अधिकारी हजर होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.