'VSR कंपनीला कोण वाचवतंय...'
रोहित पवारांनी 'त्या' केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा मागत मोदी-शाहांकडेही केली मोठी मागणी
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) चे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन गंभीर प्रश्न उपस्थित केले. तसेच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
रोहित पवार म्हणाले की, या विमान अपघाताबाबत त्यांनी स्वतःच्या पातळीवर चौकशी केली असून त्यात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. दुर्घटनाग्रस्त विमान ज्या VSR Ventures Private Limited कंपनीचे होते, त्या कंपनीला मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तींकडून वाचवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले, VSR कंपनीशी संबंधित काही व्यक्ती सत्ताधारी वर्तुळात आहेत. काही जण राज्य पातळीवर तर काही जण केंद्रात सत्तेला पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी संबंधित आहेत. "जर कोणी VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तोही या कटाचा भाग आहे," असा आरोप त्यांनी केला. तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) मधील काही अधिकारीही कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.
"या प्रकरणात जर अजित पवार यांना न्याय मिळवून देऊ शकतील, तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहच आहेत." त्यांनी दोघांनाही या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याचे आवाहन केले असून पंतप्रधानांना ईमेलद्वारे पत्र पाठवणार असल्याचे सांगितले. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हा मुद्दा प्रमुख्याने उपस्थित करावा, अशी मागणी रोहित पवार केली.
रोहित पवार यांनी अपघाताच्या तांत्रिक बाबींवरही प्रश्न उपस्थित केले. अपघाताच्या वेळी विमानात एक नव्हे तर अनेक स्फोट झाले, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे 'ब्लॅक बॉक्स' संदर्भातही शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच विमानात यांत्रिक आणि देखभालीसंबंधी गंभीर त्रुटी होत्या, असा रोहित पवारांनी केला.
याशिवाय प्रवाशांच्या सामानासाठी असलेल्या जागेत अतिरिक्त पेट्रोलचे कॅन ठेवण्यात आले होते. त्यातूनच आग लागून हा भीषण अपघात झाला, असा गंभीर आरोप त्यांनी केला. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, जेणेकरून अजित पवार यांना न्याय मिळू शकेल, अशी त्यांची मागणी आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.