'आमच्या बैठकीबाबत त्यांना काय माहिती'
मुंबई : खरा पंचनामा
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रिकरणाची प्रक्रिया सुरूच झाली नव्हती, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादा गटातील नेत्यांनी केला. त्यांच्या या आरोपांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले. जे आमच्या बैठकीत चर्चेलाच नव्हते, त्यांना आमच्यात काय चर्चा झाली, याची कशी माहिती असेल? असा सवाल पवार यांनी केला. एकप्रकारे शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि दादा गटातील नेत्यांचे दावे खोडून काढले.
शरद पवार यांनी मुंबईत सोमवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. या चर्चेत राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर आतापर्यंत काय काय चर्चा झाली होती, त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू झाली होती का? असे प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विलीनीकरणावरील दावाही पवार यांच्यासमोर ठेवला. तेव्हा त्यांनी दादा गटातील नेत्यांना आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही बोचरा वार केला.
विलीनीकरणाच्या चर्चा सुरूच नव्हत्या असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून दावा करण्यात आला होता. त्यांच्या याच दाव्याला शरद पवार यांनी जोरदार उत्तर दिले. विलीनीकरणाच्या चर्चेत जे नव्हते त्यांना आमच्याच बैठकीबाबत काय माहिती असणार? असे शरद पवार म्हणाले. याउलट राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाबाबत आमच्यात चर्चा झाली होती. आमच्या बैठकाही झाल्या होत्या. १२ फेब्रुवारीला आम्ही त्यासंदर्भात घोषणा करणार होतो, असे शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विलीनकरणाची चर्चा फेटाळून लावताना अजित पवारांनी आपल्याशी अशी कोणतीही चर्चा केली नव्हती असा दावा केला. अजित पवार माझे खूप चांगले मित्र होते. प्रत्येक गोष्ट ते आम्हाला सांगायचे. एवढी मोठी गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली नसती का? असा सवाल उपस्थित करीत पुढेही असा काही निर्णय होणार असेल तर त्यांनी भाजपशी सल्लामसलत करावी, असे फडणवीस म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.