एमआयएमच्या पाठींब्याने भाजपचा महापौर
अमरावती : खरा पंचनामा
अमरावती महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत आज मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-महायुतीचे उमेदवार श्रीचंद तेजवानी यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत एमआयएमच्या (MIM) महिला नगरसेविकेने भाजपला पाठिंबा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
८७ सदस्यीय अमरावती महानगरपालिकेत बहुमतासाठी लागणारा आकडा गाठण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली होती. महायुतीमध्ये भाजप, नवनीत राणांचा युवा स्वाभिमान पक्ष, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आधीच एकत्र होते. मात्र, ऐनवेळी बडनेरा येथील एमआयएमच्या महिला नगरसेविका मीरा कांबळे यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आणि श्रीचंद तेजवानी यांचा मार्ग मोकळा झाला. अमरावती महानगरपालिकेत भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर पदी तर उपमहापौर पदी रवी राणा यांच्या युवा स्वाभिमांनचे सचिन भेंडे विजयी झाले आहेत.
महाविकास आघाडीने या निवडणुकीत महायुतीला रोखण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली होती. मात्र, महायुतीच्या एकजुटीसमोर आणि एमआयएमच्या एका नगरसेविकेच्या अनपेक्षित पाठिंब्यामुळे विरोधकांचे मनसुबे उधळले गेले. एका नगरसेविकेने भाजपला पाठिंबा दिला. तर, एमआयएमच्या उर्वरित नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली. श्रीचंद तेजवानी यांच्या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी महापालिका परिसरात मोठा जल्लोष केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.