गौतम अदानी सिल्व्हर ओक निवासस्थानी शरद पवारांच्या भेटीला!
मुंबई : खरा पंचनामा
उद्योगपती गौतम अदानी हे मुंबईत शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ते रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान दाखल झाले. ही भेट सांत्वनपर असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येतंय.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. त्यातच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शनिवार, दि. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यापूर्वी त्यांची विधिमंडळ पक्षनेता म्हणून पक्षाच्या आमदारांनी निवड केली होती.
गौतम अदानी आणि शरद पवार यांची भेट सांत्वनपर असल्याचं सांगितलं जातंय. मात्र राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात १७ जानेवारी रोजी अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक झाली होती, असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे.
खुद्द शरद पवार यांनीही दोन्ही पक्ष एकत्र यावेत, अशी भूमिका घेतली आहे. जयंत पाटील यांनी तर, ही अजित पवारांची इच्छा होती, असं म्हटलंय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते याबाबत अनभिज्ञ असल्याचं दाखवत आहेत. त्यामुळे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे नेते सध्यातरी दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत सकारात्मक नसल्याचं दिसंतय.
त्यातच रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, दोन्ही पक्ष एकत्र येण्यासंदर्भात अजितदादा आम्हाला बोलले नव्हते. एकत्र येण्याची तारीख ठरली असती तर नक्कीच दादांनी आम्हला सांगितलं असतं. शरद पवार आणि अजितदादा यांच्यात कोय बोलणी झाली, हे मला सांगता येणार नाही.
या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर गौतम अदानी हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याने चर्चा होत आहेत. पवार कुटुंबियांसोबत अदानींचे सलोख्याचे संबंध आहेत. तर भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांसोबत उद्योगपती अदानींचे संबंध आहेत. त्यामुळे या भेटीकडे राजकीय अर्थाने बघितलं जातंय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.