विमान तिकीट आता विनादंड रद्द होणार !
DGCAच्या नव्या नियमांमुळे प्रवाशांना दिलासा
नवी दिल्ली : खरा पंचनामा
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांसाठी तिकीट परताव्याच्या नियमांत सुधारणा केली आहे. आता प्रवासी काही अटींच्या अधीन राहून, तिकीट आरक्षित केल्यापासून ४८ तासांच्या आत कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तिकीट रद्द करू शकतात किंवा त्यात बदल करू शकतात.
ही सवलत अशा देशांतर्गत विमान प्रवासासाठी उपलब्ध नसेल, ज्यांच्या प्रवासाची तारीख बुकिंगपासून सात दिवसांपेक्षा कमी आहे. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या बाबतीत, प्रवासाची तारीख बुकिंगपासून किमान १५ दिवस नंतरची असणे आवश्यक आहे.
प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर असे सुधारित नियम जाहीर करताना डीजीसीएने म्हटले आहे की, जर प्रवाशाने एअरलाइनच्या वेबसाइटवरून थेट तिकीट बुक केले असेल आणि बुकिंगनंतर २४ तासांच्या आत नावात चूक असल्याचे निदर्शनास आणून दिले, तर त्याच व्यक्तीच्या नावातील दुरुस्तीसाठी एअरलाइन्सने कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये.
डीजीसीएने स्पष्ट केले आहे की, ट्रॅव्हल एजंट किंवा पोर्टलद्वारे तिकीट खरेदी केले असल्यास, परतावा देण्याची जबाबदारी एअरलाइन्सची असेल, कारण एजंट हे त्यांचे नियुक्त प्रतिनिधी असतात. एअरलाइन्सने परतावा प्रक्रिया १४ कामकाजाच्या दिवसांत पूर्ण होईल याची खात्री करावी.
याव्यतिरिक्त, प्रवाशावर ओढवलेल्या वैद्यकीय आणीबाणीमुळे तिकीट रद्द करण्याच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. डीजीसीएच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये विमान कंपन्यांकडे प्रवाशांच्या एकूण २९,२१२ तक्रारी आल्या होत्या, ज्यापैकी ७.५ टक्के तक्रारी या केवळ परताव्याशी संबंधित होत्या. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी विमान वाहतूक बाजारपेठ असून २०२५ मध्ये देशांतर्गत विमान कंपन्यांनी १६.६९ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.