'खरा पंचनामा'च्या बातमीचा इफेक्ट
राज्य उत्पादन शुल्कमधील 18 जणांची आता आयुक्त स्तरावरील समिती करणार चौकशी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आ. जयंत आसगावकर, सतेज पाटील यांच्या प्रश्नांना लेखी उत्तर
तोतयाची गणवेशात आलिशान कारमधून दारू तस्करी प्रकरण
मुंबई : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शासकीय गणवेशात अंबर दिव्याच्या आलिशान कारमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या तोतयासह सैन्य दलातील निवृत्त सैनिकास मार्चमध्येअटक करण्यात आली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याच्या गणवेशात असलेल्या तोतयाच्या कॉल डिटेल्सवरून आता या विभागातील तब्बल 18 जणांची सांगलीच्या अधीक्षकांनी चौकशी करून अहवाल दिला होता. मात्र आता अर्थ संकल्पीय अधिवेशनात आ. जयंत आसगावकर, सतेज पाटील यांनी याच संदर्भात विचारलेल्या लेखी प्रश्नाला उपमुख्यमंत्री तसेच राज्य उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रा पवार यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यामध्ये आता आयुक्त स्तरावरील समिती या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे. 'खरा पंचनामा'ने याबाबत सतत बातम्याद्वारे पाठपुरावा केला होता.
या दारू तस्करीप्रकरणी नितीन दिलीप ढेरे (वय ३३, रा. जाधववाडी, कोल्हापूर) आणि सेवानिवृत्त जवान शिवाजी आनंदा धायगुडे (५७, रा. अंदोरी, ता. खंडाळा, जि. सातारा) अशी दोघांची नावे आहेत. पथकाने अडीच लाखांची दारू, २५ लाखांची दोन वाहने, मोबाइल असा एकूण २७लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दि. २३ मार्च रोजी पहाटे नेसरी ते गडहिंग्लज मार्गावर महागावच्या हद्दीत केली होती.
तोतया कर्मचारी ढेरे हा कोल्हापुरातील विविध शासकीय विभागातील अधिकाऱ्यांकडे खासगी चालक म्हणून दहा वर्षांपासून काम करीत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्यांकडेही त्याने काम केले आहे. त्याला शासकीय गणवेशाचे बारकावे माहिती होते.
त्याला अटक केल्यावर त्याच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्सवरून त्याच्याशी संपर्कात असलेल्या राज्य उत्पादन शुल्कमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची राज्य उत्पादन शुल्कचे सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी चौकशी करून अहवाल दिला होता. मात्र त्यात कोणीही दोषी नसल्याचे दिसत असल्यामुळे आमदारांनी याबाबत विधिमंडळ अधिवेशनात लेखी प्रश्न विचारला होता.
आमदारांनी विचारलेले प्रश्न त्यावर मंत्र्यांचे उत्तर :
(१८) ७३६६ श्री. जयंत आसगावकर, श्री. सतेज ऊर्फ बंटी पाटील, श्री. अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री. अभिजित वंजारी, श्री. राजेश राठोड, श्री.धीरज लिंगाडे, श्री. सुधाकर अडबाले : सन्माननीय उप मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) गोवा बनावटी दारु तस्करी प्रकरणातील बोगस अधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर कार्यालयातील १८ कर्मचारी आणि अधिकारी यांच्या संगनमताने बनावट दारुची तस्करी केली जात असल्याचे माहे डिसेंबर, २०२५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, सदर गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी या विभागातील सांगलीचे अधीक्षक यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, सदर प्रकरणाचा सहा महिने इतका कालावधी होऊनही अहवाल प्राप्त झालेला नसल्याचे निदर्शनास आले असून गोवा बनावटीच्या दारू तस्करीतील सहभागी उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर कार्यालयातील १८ कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा चौकशी अहवाल प्राप्त होण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?
श्रीमती सुनेत्रा पवार : (१) हे अंशतः खरे आहे.
एका खाजगी इसमाने शासकीय गणवेश परिधान करुन राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी असल्याचे भासवून गोवा बनावटीचे मद्य तस्करी केल्याने माहे मार्च, २०२५ मध्ये कोल्हापूर जिल्हा भरारी पथकामार्फत गुन्हा रजि.क्र.६५/२०२५, दिनांक २३/०३/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यांच्या न्यायालयात क्र. आरसीसी १९३/२०२५ दिनांक २३ डिसेंबर, २०२५ अन्वये दोषारोप दाखल करण्यात आलेले आहेत.
(२) होय, हे खरे आहे.
(३) सदरचा प्राथमिक चौकशी अहवाल विभागीय उप आयुक्त, कोल्हापूर यांच्यामार्फत आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयास प्राप्त झालेला असून सदर अहवालामध्ये उक्त गुन्ह्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर कार्यालयातील १८ कर्मचारी/अधिकारी यांचे संगनमत असल्याचे सिध्द झालेले नाही. तथापि, याबाबत आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क यांच्या स्तरावरुन सखोल चौकशी करण्यात येत आहे.
(४) प्रश्न उद्भवत नाही.
विविध आरोप असलेला अधिकारी करणार चौकशी?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या उत्तरानुसार आयुक्त स्तरावरील समिती चौकशी करणार आहे. मात्र या चौकशी समितीत एका वादग्रस्त अधिकाऱ्याचा समावेश असल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागात चर्चा आहे. ज्या अधिकाऱ्यावर यापूर्वी गंभीर आरोप झाले आहेत तोच अधिकारी यांची निपक्ष चौकशी करणार का? अशी चर्चा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.