Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन दोन्ही शिवसेना भिडल्या गृहमंत्री शहांच्या भेटीचे कारण आले समोर

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन दोन्ही शिवसेना भिडल्या 
गृहमंत्री शहांच्या भेटीचे कारण आले समोर

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान ते केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीचे कारण अजून समोर आले नाही, मात्र राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आगामी काळात राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा या दौऱ्यात होणार असल्याचीही चर्चा आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, मंगळवारी सकाळी संसद भवनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दिल्लीत सध्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु आहे. शिंदेच्या दिल्ली भेटीवर शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, दिल्लीमध्ये संसदेचे अधिवेशन काळात एकनाथ शिंदे हे दिल्लीला जात असतात. हा त्यांचा नियमीत दौरा आहे. तर, शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली आहे.

शंभुराज देसाई म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले की, काही लोकांना धडकी भरते. त्यांना विचारले पाहिजे की, उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीला गेले की तुम्हाला धडकी का भरते, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. ते म्हणाले की, पक्षाच्या खासदारांच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले आहेत. राज्यातील काही प्रश्न हे केंद्रीय पातळीवर सोडवले जातात, विविध केंद्रीय मंत्र्यांना त्यासाठी भेटावे लागते. त्यासाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले आहेत. ते दिल्लीला काही पहिल्यांदा गेलेले नाहीत, जेव्हा जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरु होते तेव्हा एकनाथ शिंदे हे दिल्लीला जात असतात, असेही ते म्हणाले.

शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे हायकमांड दिल्लीत बसतात. त्यामुळे त्यांना चर्चा करण्यासाठी दिल्ली भेटीसाठी यावे लागते. शिंदेसेनेचे निर्माते अमित शहा आहेत, त्यांच्या भेटीसाठी त्यांना दिल्लीला यावे लागते, असे म्हणत खासदार राऊत यांनी टीका केली.

खासदार संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शिंदेसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निर्माते आहेत. त्यामुळे त्यांना भेटणे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आवश्यक असते, असेही राऊत म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. आगामी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत शिवसेनेनची भूमिका काय असणार यावर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच आगामी काळात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) समन्वय यावरही या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या भेटीदरम्यान एकनाथ शिंदे हे या खटल्याशी संबंधीत त्यांच्या वकिलांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली येथे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांची बैठक एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री बोलावली होती. या बैठकीत अधिवेशनातील विविध कामकाज, अर्थसंकल्पावरील चर्चा तसेच देशासमोरील सध्याच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली, असे एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे.

सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासमोर निर्माण होणाऱ्या संभाव्य आर्थिक आणि पुरवठा साखळीशी संबंधित आव्हानांवरही यावेळी विचारमंथन झाले. देशहित आणि जनतेच्या हिताला प्राधान्य देत केंद्र सरकारच्या धोरणांना भक्कम पाठिंबा देण्याची भूमिका या बैठकीत स्पष्ट केली, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.