राज्यातील तीन अधिकारी केंद्रात सचिवपदासाठी पात्र
मुंबई : खरा पंचनामा
राज्याच्या सेवेतील तीन सनदी अधिकारी केंद्र सरकारमध्ये सचिवपदासाठी तर चार अधिकारी केंद्रात अतिरिक्त सचिवपदासाठी पात्र ठरले आहेत. केंद्रात सचिवपदासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९३च्या तुकडीतील सुरेंद्रकुमार बागडे तसेच सचिव समकक्षपदासाठी मनीषा वर्मा या पात्र ठरल्या आहेत.
यापैकी बागडे सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. १९९५च्या तुकडीतील राधिका रस्तोगी या सचिव समकक्षपदी पात्र ठरल्या आहेत. सचिवपदासाठी पात्र ठरलेल्या अधिकाऱ्याची थेट कोणत्याही खात्याच्या सचिवपदी नियुक्ती होऊ शकते. सचिव समकक्षपदासाठी पात्र ठरलेल्या अधिकाऱ्याची थेट खात्याच्या सचिवपदी नियुक्ती होत नाही पण सचिवपदाशी समकक्ष असलेल्या पदांवर नियुक्ती होऊ शकते.
२००१च्या तुकडीतील डॉ. श्रीकर परदेशी, प्राजक्ता लवंगरे-वर्मा, निपूण विनायक व विजयालक्ष्मी बिदरी हे चार राज्याच्या सेवेतील अधिकारी केंद्रात अतिरिक्त सचिवपदासाठी पात्र ठरले आहेत. सचिवपदासाठी ३० वर्षे सेवा झाल्यावर सेवेतील कामगिरीचा आढावा घेतल्यावर पात्र ठरतात. २५ वर्षांच्या सेवेनंतर अतिरिक्त सचिवपदासाठी केंद्रात नियुक्तीसाठी पात्र ठरतात. केंद्रात यापूर्वी प्रतिनियुक्ती केली असली तरीच सचिव किंवा अतिरिक्त सचिवपदासाठी अधिकारी पात्र ठरतात.
सचिव किंवा अतिरिक्त सचिवपदासाठी पात्र ठरले असले तरी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्याचा निर्णय हा अधिकाऱ्यांवर अवलंबून असतो. महाराष्ट्राच्या सेवेतील अधिकारी शक्यतो केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्याचे टाळतात. केंद्रातील प्रशासनात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व कमी असल्याबद्दल मागे केंद्र सरकारने राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच केंद्रातील सनदी अधिकाऱ्यांचे प्रतिनिधीत्व वाढविण्याची सूचना केली होती. तरीही राज्यातील अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्यास फारसे उत्सूक नसतात.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.