राष्ट्रपतींचा अपमान मी नाही पंतप्रधान मोदी यांनी केला!
ममता बॅनर्जीनी फोटोच दाखवला
कोलकाता : खरा पंचनामा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याचा कांगावा करणाऱ्या भाजपला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज आरसा दाखवला. 'राष्ट्रपतींचा अपमान मी नाही तर पंतप्रधान मोदी यांनी केला', असा पलटवार ममतांनी केला. कोलकात्यात सुरू असलेल्या एसआयआरविरोधी आंदोलनाच्या स्टेजवरून त्यांनी 2024 मधील एक फोटोच देशासमोर आणला.
नुकत्याच पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेलेल्या राष्ट्रपती मुर्मू यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दांडी मारली होती. तसेच राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाची जागाही बदलण्यात आली होती. त्यावरून राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली व काही राजकीय टीकाटिप्पणीही केली. त्यांना ममतांनीही प्रत्युत्तर दिले. त्यावरून ममतांनी राष्ट्रपतींचा अपमान केल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. मोदींच्या या आरोपाला ममतांनी सडेतोड उत्तर दिले.
तृणमूल काँग्रेसने मीडियासमोर दाखवलेला फोटो 2024 चा आहे. 'राष्ट्रपती मुर्मू या भाजपचे वयोवृद्ध नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देतानाचा तो प्रसंग आहे. हा पुरस्कार देताना मुर्मू स्वतः उभ्या होत्या. राष्ट्रपती व पुरस्काराचा सन्मान म्हणून त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनीही उभे राहणे अपेक्षित होते, मात्र मोदी आडवाणी यांच्या बाजूला बसून होते. हा अपमान नाही का? मोदींना आदिवासी नेत्याबद्दल आणि देशाच्या राष्ट्रपतींबद्दल आदर वाटत नाही का?,' असा सवाल ममतांनी केला.
मी राष्ट्रपतींचा अपमान केला असं भाजपवाले आणि मोदी म्हणतायत. मी इथं धरणं आंदोलन करतेय, राज्यातील जनतेसाठी भांडतेय. अशा वेळी मी राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला कशी जाऊ? आणि त्यामुळं अपमान कसा होतो? - ममता बॅनर्जी
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.