Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भरचौकात ट्रक चालकाला मारहाण; पंढरपूर पोलिसांच्या 'दबंगगिरी'ने शहर हादरले

भरचौकात ट्रक चालकाला मारहाण; पंढरपूर पोलिसांच्या 'दबंगगिरी'ने शहर हादरले

पंढरपूर : खरा पंचनामा 

विठ्ठलाच्या नगरीत कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंढरपूर शहरात अवजड वाहतूक घुसल्याच्या कारणावरून पोलिसांनी एका ट्रक चालकाला भरचौकात बेदम मारहाण केली.

या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच मोहोळचे आमदार राजू खरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पोलिसांना धारेवर धरले आणि या प्रकरणाचा जाब विचारला.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असतानाही एक ट्रक शहरात शिरला. यावेळी वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांनी ट्रक चालकाला अडवले. मात्र, केवळ चूक समजावून सांगण्याऐवजी किंवा रीतसर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी ट्रक चालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. उपस्थित नागरिकांनी या मारहाणीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला, जो काही वेळातच सर्वत्र व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी चालकाला मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहे.

ही घटना घडत असताना आणि पोलीस आणि चालक यांच्यात हुज्जत सुरू असतानाच मोहोळचे आमदार राजू खरे तिथे पोहचले. त्यांनी मारहाण करणाऱ्या पोलिसांना कडक शब्दांत सुनावले.

या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ट्रक चालकाने पोलिसांवर केलेले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप. "साहेबांनी आधी माझ्याकडून 2000 रुपये घेतले आणि गाडी सोडली. पण त्यानंतर पुन्हा मला कोर्टात जाऊन चलन भरण्यास सांगितले," असे पीडित ट्रक चालकाने माध्यमांशी बोलताना सांगितले. पैशांची देवाणघेवाण करूनही पुन्हा कायदेशीर कारवाईची भीती दाखवल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पंढरपूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आमदार राजू खरे यांनी संबंधित दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.