कला केंद्राच्या आड सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; २५ तरुणींची सुटका
उपसरपंच बर्गे प्रकरणातील नर्तिका अटकेत
माढा : खरा पंचनामा
मोडनिंब येथील पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही मीटर अंतरावर सुरू असलेल्या 'स्वरांजली कला केंद्र'च्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
टेंभुर्णी पोलिसांनी १५ मार्च रोजी छापा टाकून तब्बल २५ तरुणींची सुटका केली असून एका महिलेसह पाच जणांवर मानवी तस्करी आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील नर्तिका देखील या सेक्स रॅकेटमध्ये अडकलेली असल्याचे समोर आले आहे. गोविंद बर्गे यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे कारमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्या प्रकरणामुळे राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणातील नर्तिका पूजा गायकवाड हिला अटक केली असून ती सध्या पोलिस कोठडीत आहे. चौकशीत तिने बर्गे यांच्यासोबत संबंध असल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, 'स्वरांजली कला केंद्र' हे नावापुरतेच असून प्रत्यक्षात येथे वेश्याव्यवसायाचे जाळे चालवले जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. येथे श्रीमंत ग्राहकांसाठी पार्त्यांचे आयोजन केले जात असे. नर्तिकांच्या नृत्य कार्यक्रमांच्या आडून ग्राहकांना आकर्षित करून त्यांना अनैतिक कृत्यांकडे ढकलण्याचे रॅकेट चालत होते. अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या छाप्यात केंद्रातून मोठ्या प्रमाणात अश्लील साहित्य, मोबाईल फोन आणि रेकॉर्डिंग उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. बाहेरून आणलेल्या तरुणींना येथे कोंडून ठेवून त्यांना ग्राहकांसमोर नृत्य करण्यास व अनैतिक कृत्यांसाठी भाग पाडले जात असल्याची माहिती समोर आली आहे. याठिकाणी हाय-प्रोफाईल अश्लील पार्त्यांचेही आयोजन होत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणामुळे आधीच राज्यात खळबळ उडाली असताना, त्याच प्रकरणातील नर्तिका या सेक्स रॅकेटमध्ये सापडल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून मुख्य सूत्रधारांसह आणखी काही आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.