Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवरही फायरिंग

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार 
आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवरही फायरिंग

ठाणे : खरा पंचनामा 

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कौसा परिसरात शनिवारी पहाटे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कन्स्ट्रक्शन व्यावसायिक नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान (वय 45) यांच्या घराबाहेर गोळीबाराची धक्कादायक घटना घडली.

अज्ञात हल्लेखोरांनी खान यांच्या घराबाहेर उभी असलेल्या कारवर गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणात पोलिसांनी धाडसी कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून दोन पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि मॅगझिन जप्त करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 7 मार्च 2026 रोजी पहाटे सुमारे 4.54 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा येथील कौसा भागातील अरमान को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये गोळीबार झाल्याचा कॉल बिट क्रमांक 3 च्या पोलिसांना प्राप्त झाला. कॉल मिळताच अवघ्या पाच मिनिटांत बिट मार्शल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी करून तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत यांना माहिती दिली. त्यानंतर सावंत, सपोनि सोनवणे आणि तपास पथकातील अधिकारी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान यांच्या घराबाहेर उभी असलेल्या MH 03 CN 5900 क्रमांकाच्या कारवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या तसेच हवेतही गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामुळे कारचे किरकोळ नुकसान झाले.

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गोळीबार करणारा आरोपी मुंब्यातील आचार गल्ली परिसरात लपून बसला आहे. त्यानुसार पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहोचले.

पोलिसांनी आरोपीला बाहेर येण्यास सांगितले असता त्याने दोन्ही हातात पिस्तुले घेऊन पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. आरोपी भंगार गोदामातून बाहेर येत पुन्हा पोलिस आणि परिसरातील जमावाच्या दिशेने गोळीबार करू लागला. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून पोलिसांनी संयम बाळगला.

यानंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. या दरम्यान आरोपीने मागे वळून पुन्हा गोळीबार केला. या गोळीबारात जमावातील एका व्यक्तीच्या पोटात गोळी लागली तर दुसऱ्या व्यक्तीच्या हाताला दुखापत झाली. जखमी दोघांना तातडीने काळसेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पोलिसांनी पाठलाग करत अखेर आरोपीला जमिनीवर पाडून पकडले. यावेळी आरोपीच्या हातातील एक पिस्तूल खाली पडले, तर दुसऱ्या पिस्तूलमध्ये तीन जिवंत काडतुसे असताना तो पुन्हा गोळीबार करण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत त्याच्याकडील दोन्ही पिस्तुले हिसकावून घेतली.

दरम्यान, घटनास्थळी जमलेल्या काही नागरिकांनी आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत आरोपीला जमावाच्या तावडीतून सुरक्षित बाहेर काढले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.