Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सव्वा कोटींची लाच मागणारे राज्य जीएसटी उपायुक्त, सहाय्यक आयुक्त एसीबीच्या जाळ्यात

सव्वा कोटींची लाच मागणारे राज्य जीएसटी उपायुक्त, सहाय्यक आयुक्त एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : खरा पंचनामा 

जीएसटी कारवाईचा तपास लवकर पूर्ण करण्यासाठी सव्वा कोटींची लाच मागून तडजोडीअंती निश्चित झालेल्या रकमेतील पहिला हप्ता म्हणून २० लाख रुपये स्वीकारताना राज्यकर उपायुक्त आणि सहाय्यक राज्य कर आयुक्त यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

पाथर्डी फाटा येथील वस्तू व सेवा कर कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईच्या पथकाने ही कारवाई केली. यामुळे जीएसटी विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

वस्तू व सेवा कर कार्यालयातील राज्य कर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे (४७, दीप दर्शन, आदर्शनगर, चाणक्य पूरी रोड, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक), सहायक राज्यकर आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे (५५, समर्थ ब्लॉसम अपार्टमेंट, चेरी गार्डन लेन, गंगापूर पोलीस ठाण्याच्या मागे, नाशिक) आणि खासगी व्यक्ती अमित हिरामण जाधव (३६, कालिका पार्क, त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत. तक्रारदाराचे शहरातील दामोदर चौक भागात कार्यालय आहे. या ठिकाणी संशयित अधिकाऱ्यांनी जीएसटी कारवाई केली होती. या कार्यालयातील तपास लवकर पूर्ण करण्यासाठी राज्य कर उपायुक्त पागे व सहायक राज्यकर आयुक्त दोंदे यांनी एक कोटी २५ लाख रुपयांची लाच मागितली. तक्रादाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई कार्यालयाकडे तक्रार दिली.

या तक्रारीच्या आधारे पथकाने केलेल्या पडताळणीत संशयित अधिकाऱ्यांनी तक्रारदाराशी तडजोडीअंती एक कोटी रुपये निश्चित केले. आणि पहिला हप्ता म्हणून २० लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी सापळा रचण्यात आला. पाथर्डी फाटास्थित वस्तू व विक्री कर कार्यालयात लाचेच्या रकमेतील पहिला हप्ता म्हणून २० लाख रुपये पागे व दोंदे यांच्यावतीने खासगी व्यक्ती अमित जाधव याने स्वीकारले. यावेळी पथकाने त्याला रंगेहात पकडले. नंतर दोन अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी संशयित राज्यकर उपायुक्त सोमनाथ पागे, सहायक राज्यकर आयुक्त मच्छिंद्र दोंदे आणि खासगी व्यक्ती अमित जाधव यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने वस्तू व सेवा कार्यालयाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.