सांगलीत धारदार शस्त्राने सपासप वार करत तरुणाचा निर्घृण खून
एक संशयित ताब्यात
सांगली : खरा पंचनामा
पूर्व वैमनस्यातून सांगलीत तरुणाचा सोमवारी सायंकाळी खून करण्यात आला. शहरातील जुना कुपवाड रोडवरील दुधाळ कॉर्नर येथे ही घटना घडली. दोघांनी एडका आणि चाकूसारख्या धारदार शस्त्राने हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच मृत्यू झाला.
सौरभ महादेव पवार (वय २२ ) असे मृत तरुणाचे नाव आहे. हल्लेखोरांपैकी शाहिद समीर मुल्ला (वय २२) याला पकडण्यात आले असून आयान समीर भिस्ती हा पसार झाला आहे. दरम्यान, मृत सौरव पवार आणि त्याच्यावर हल्ला करणारे दोघेजण हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. सौरभ याच्यावर घरफोडी केल्याचा गुन्हा दाखल आहे तर मुल्ला आणि आयान भिस्ती हे दुचाकी चोरीतील संशयित आहेत. ही खुनाची घटना नशेखोरांचा अड्डा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डार्कस्पॉट परिसरात घडली आहे.
जुना कुपवाड रोडवर दुधाळ कॉर्नर येथील महापालिकेच्या गाळ्यांच्या समोर सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जुना कुपवाड रोडवरील राजीवनगर मध्ये राहणारा सौरभ पवार हा फरशी फिटिंग चे काम करत होता. हल्लेखोर शाहीद मुल्ला आणि आयान हेही राजीवनगर मध्येच दुसऱ्या गल्लीत राहतात. हेही फरशी फिटिंगचेच काम करतात. हल्लेखोर आणि मयत पवार यांच्यात पूर्वी वाद होऊन मारामारी झाली होती.
सोमवारी सायंकाळी मयत सौरभ पवार आणि ओंकार पाथरवट असे दोघेजण दुचाकीवरून महापालिकेच्या गाळ्यांच्या पाठीमागे आले. हल्लेखोर दोघेही अगोदरच त्या ठिकाणी उपस्थित होते. संशयित शाहिद मुल्ला हा गाडी कितीला घेतलीस असे विचारत सौरभच्या जवळ गेला आणि त्याने चाकूने सौरभच्या गळ्यावर वार केला. हल्ला होताच सौरभने गाळ्यांकडे धाव घेतली. त्याचा पाठलाग करत दोघांनी पुन्हा त्याच्यावर चाकू आणि एडका हत्याराने हल्ला केला. त्याही अवस्थेत रक्तबंबाळ झालेल्या सौरभने त्याच परिसरात असलेल्या आपल्या घराकडे धाव घेतली. तो गंभीर जखमी अवस्थेत गल्लीत आल्याचे दिसताच गल्लीतल्या नागरिकांनी त्याला त्वरित एका खाजगी गाडीतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.