Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"या ब्रिजवर चढू शकता पण उतरू शकत नाही"

"या ब्रिजवर चढू शकता पण उतरू शकत नाही"

पुणे : खरा पंचनामा 

शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उभारण्यात आलेल्या बालेवाडी-वाकड जोडणाऱ्या पुलाबाबत आश्चर्यकारक वास्तव समोर आले आहे. मुळा नदीवर उभारण्यात आलेला हा पूल तब्बल ३१ कोटी रुपयांचा खर्च करून बांधण्यात आला असला तरी त्याला योग्य अप्रोच रोडच नसल्याने नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष वापर करता येत नसल्याची बाब समोर आली आहे.

या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेच्या अधिवेशनात जोरदार टीका केली. 'पुण्यातील बालेवाडी आणि वाकडला जोडणारा हा ब्रिज म्हणजे जगातील आठवे आश्चर्यच म्हणावे लागेल. कारण या ब्रिजवर तुम्ही चढू शकता; मात्र उतरू शकत नाही,' असे उपरोधिक वक्तव्य त्यांनी केले.

मुळा नदीवर बांधण्यात आलेला हा पूल वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार होता. बालेवाडी, वाकड, हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात आला. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूंना आवश्यक असलेली जमीन अधिग्रहित करण्यात आलेली नाही. परिणामी पुलासाठी अप्रोच रोड तयारच झालेला नाही. यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही हा पूल प्रत्यक्ष वापरासाठी खुला करता आलेला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या कराच्या पैशातून उभारलेला पूल वापरातच नसल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आमदार जयंत पाटील यांनी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधत या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि तातडीने जमीन अधिग्रहण करून अप्रोच रोड तयार करण्याची मागणी केली. दरम्यान, या पुलामुळे भविष्यात बालेवाडी-वाकड परिसरातील वाहतूक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्यासाठी प्रशासनाने आवश्यक जमीन अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण करून अप्रोच रोड लवकरात लवकर तयार करणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.