Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दुबईत ड्रोन हल्ल्यानंतर विमान उड्डाणं स्थगित, १९ भारतीयांसह ३५ जणांना युएईत अटक

दुबईत ड्रोन हल्ल्यानंतर विमान उड्डाणं स्थगित, १९ भारतीयांसह ३५ जणांना युएईत अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगभरात तणाव निर्माण झाला आहे. आखाती देशही या युद्धामुळे संकटात सापडले आहेत. इराण सातत्यानं दुबईसह युएईतील अनेक शहरांवर हल्ले करत आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी झालेल्या हल्ल्यानंतर उड्डाणं अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी विमानतळाजवळ आग लागल्याच्या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव विमान उड्डाणे बंद केली. दरम्यान, सोशल मीडियावर दिशाभूल करणारे व्हिडीओ आणि फोटो शेअर करणाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात येत आहे. चुकीचे व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी १९ भारतीय नागरिकांसह ३५ जणांना अटक करण्याचे आदेश युएई सरकारने दिलेत.

युएईच्या डब्ल्यूएएम या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार दिशाभूल करणारे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपींना तातडीने न्यायालयात हजर केलं जाईल. या यादीत परदेशातील २५ नागरिकांचा समावेश असून त्यात १७ भारतीय आहेत. तर शनिवारी जारी केलेल्या १० जणांच्या यादीत दोन भारतीयांचा समावेश होता. त्यांनाही अटक करण्याचे आदेश देण्यात आलेत.

युएईचे अटॉर्नी जनरल डॉक्टर हमाद सैफ अल शम्सी यांनी सांगितले की, डिजिटल प्लॅटफॉर्मवर आमची करडी नजर आहे. अशांतता निर्माण करण्याचा आणि भीती पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. अफवा पसरवण्यापासून रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती युएई प्रशासनाने दिलीय.

चौकशी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखरेखीनंतर संबंधित आरोपींकडून गटाने व्हिडीओ व्हायरल केले जात होते असंही सांगण्यात येतंय. युद्धाच्या घटनांशी संबंधित काही खरे व्हिडीओ आणि त्यात एआय व्हिडीओ जोडून परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येतंय. तसंच लष्करी आक्रमण करणाऱ्या देशाचं कौतुक करत त्यांच्या लष्करी कारवाईचा प्रचार केल्याचा संबंधितांवर आरोप आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.