Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्राला मिळणार 27 नवीन आमदार!विधानपरिषदेसाठी आयोगाकडून हालचालींना वेग

महाराष्ट्राला मिळणार 27 नवीन आमदार!
विधानपरिषदेसाठी आयोगाकडून हालचालींना वेग

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्याने आता विधानपरिषदेतील अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या जागांवर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत महाराष्ट्राला तब्बल 27 नवे आमदार मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून निवडणूक आयोगाकडून यासाठी चाचपणी सुरू आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या 17 जागा गेल्या तीन वर्षांपासून रिक्त होत्या. संबंधित संस्थांमध्ये मतदारसंख्या उपलब्ध नसल्यामुळे या जागांवर निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. मात्र अलीकडेच नगरपालिका, महापालिका तसेच काही जिल्ह्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्याने परिस्थिती बदलली आहे.l

दरम्यान, उर्वरित काही जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे निवडणुका झालेल्या नसल्या तरी, 75 टक्क्यांपेक्षा जास्त मतदार उपलब्ध असल्यास निवडणुका घेण्याचा नियम लागू होऊ शकतो. यासाठी निवडणूक आयोगाने संबंधित मतदारांची माहिती मागवली असून लवकरच या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

याशिवाय, विधानसभेतील सदस्यांमधून निवडून द्यायच्या 9 जागांची मुदत 17 मे रोजी संपत आहे. त्यामुळे या जागांसाठीही लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्याच्या राजकीय समीकरणानुसार महायुतीला बहुसंख्य जागा मिळण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण 27 जागांसाठी निवडणुका होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हालचाली वेगात केल्या असून येत्या तीन महिन्यांत राज्याच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.